वर्धा जिल्ह्यात दर आठवड्यात ३६ तास लॉकडाऊन; नागरिकांनी घरातच थांबण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

शहर व ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवार 13 मार्च रात्री 8 ते सोमवार 15 मार्च सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी घोषित केली आहे.

  वर्धा (Wardha).  शहर व ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवार 13 मार्च रात्री 8 ते सोमवार 15 मार्च सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. मार्च महिन्यात दर आठवड्यात 36 तासांचा लॉकडाऊन राहणार आहे.

  काळजी घेऊन अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

  संचारबंदीच्या काळात काय बंद राहील
  सर्व बाजारपेठ , मॉल्स, कॉम्प्लेक्स येथील सर्व दुकाने ( वेद्यकीय सेवा वगळता) बंद राहतील. सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरेंट संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील. चहा, मिष्ठान प्रतिष्ठान, पानटपरी व इतर वस्तू विक्री, जिवनावश्यक व बिगर विनावश्यक वस्तूची दुकानेसुध्दा बंद राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खाजगी बसेस, खाजगी वाहतूक, एस. टी. बसेसची सेवा तसेच नगरपालीका हद्दीतील व जिल्हयातील ऑटो रिक्षा ची सेवा नागरिकांसाठी बंद राहील. वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोल, डिझेल पंप निर्देशाप्रमाणे बंद राहतील.

  व्यायाम शाळा, जीम,जलतरण तलाव सुद्धा बंद राहतील. शासकीय व खासगी वाचनालये ग्रंथालय, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, वाहन दुरुस्ती गॅरेज, सर्व प्रकारची बांधकामे, कटिंगची दुकाने, सलून, ब्यूटी पार्लर हे संचारबंदी कालावधीमध्ये बंद राहतील, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळ यार्ड हेसुध्दा या कालावधीत बंद राहील.

  हे सुरू राहील
  जीवनावश्यक वस्तूचा समावेश असलेली दुध डेअरी व दूध विक्रीची दुकाने ही संचारबंदीच्या कालावधीमध्ये सकाळी 6 ते सकाळी 10, सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहतील. जीवनावश्यक वस्तुची वाहतूक करणारे ट्रक मोटार व रिक्षा वाहने यांची सेवा सुरू राहील.

  आपातकालीन परिस्थितीत व रुग्णांच्या सेवेसाठी ऑटोरिक्षाची सेवा व स्वत: चे खाजगी वाहनाची सेवा घेण्याची मुभा राहील. जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठी जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात वाहतुकीच्या सेवा सुरु राहतील.
  वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची औषधी दुकाने, औषधालये, रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, औषधी व वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका तसेच अधिकृत खाजगी वैद्यकीय आस्थापना ज्या कोविड-19 च्या आवश्यकतेच्या सेवा तरतुदीसाठी आहेत, त्या सर्व सुरु राहतील.

  अत्यावश्यक सेवा अंतर्गत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी अंतर्गत वीजसेवा, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण/नगर परिषद/पालिका अंतर्गत पाणीपुरवठा सेवा, गॅस सेवा, रोड दुरुस्ती, नालेसफाई सुरु राहतील. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया, डिटीएच, केबल सेवा, वृत्तपत्रे सेवा (छपाई, विक्री व वितरण) सुरू राहतील व त्या संबंधित असलेले पत्रकार यांना त्यांच्या कामाकरीता संचार करण्याची परवानगी राहील.