काँग्रेसला देशात पुन्हा एकदा सोनियाचे दिवस येतील ! बाळासाहेब थोरात

काँग्रेसने मिळवलेले सर्व संपवण्याचे काम सुरु आहे,असे असताना आपण अस्वस्थ होणार नसाल तर पुढचा काळ तुम्हाला अस्वस्थ करणारा असेल. धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. हे चित्र बदलावे लागणार आहे, त्यासाठी पुन्हा जोमाने उभे रहायचे आहे आणि पुन्हा एकदा देशात सोनियाचे दिवस आणायचे आहेत, असे थोरात म्हणाले.

    वर्धा : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी कर्ध्यात करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महात्मा गांधींचा विचार या भूमित रुजलेला आहे, एकीकडे गांधींचा विचार व दुसरीकडे विकासाचा विचार याची सांगड घालण्याचे काम प्रमोदबाबूंनी केले. प्रमोदजी हे समाजजीवनाशी एकरुप झालेले नेतृत्व होते. राज्याच्या राजकारणात ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला त्यात प्रमोदबाबूंचे नाव वरच्या क्रमांकावर असेल. सामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटत त्यांनी विदर्भातील प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. त्यांच्याकडे असलेल्या पदांचा वापर त्यांनी नेहमी विकास कामांसाठी केला.

    देशात आज राज्यघटनेच्या विचाराची अवहेलना होत आहे. राज्यघटना मोडीत काढण्याचे काम सुरु झाले आहे. विविध संस्थांचा वापर राजकारणासाठी होत आहे. वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे, त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत पण त्यांच्याकडे पाहण्यास पंतप्रधानांना वेळ नाही. काँग्रेसने मिळवलेले सर्व संपवण्याचे काम सुरु आहे,असे असताना आपण अस्वस्थ होणार नसाल तर पुढचा काळ तुम्हाला अस्वस्थ करणारा असेल. धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. हे चित्र बदलावे लागणार आहे, त्यासाठी पुन्हा जोमाने उभे रहायचे आहे आणि पुन्हा एकदा देशात सोनियाचे दिवस आणायचे आहेत, असे थोरात म्हणाले..

    पालकमंत्री सुनिल केदार, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावेळी प्रमोद शेंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.