अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल; देवळी तालुक्यात अनेक ठिकाणी रिमझिम

पुलगाव येथील देवळी तालुक्यातील अनेक भागांत सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. या अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने आगास केलेल्या गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

    पुलगाव (Pulgaon).  देवळी तालुक्यातील अनेक भागांत सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. या अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने आगास केलेल्या गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

    अवकाळी पावसाच्या हजेरीने बळीराजा धास्तावला आहे. सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला. या नुकसानीतून सावरत नाही तोच आता पुन्हा अवकाळीचे संकट येऊन ठेपले आहे. पुलगाव शहरासह लगतच्या नाचणगाव, गुंजखेडा तसेच देवळी तालुक्यांतील कवठा रेल्वे, मलकापूर, घोडेगाव कोडणा, केळापूर, दहेगाव गावंडे परिसरात रात्रभर आणि दिवसासुद्धा झिमझिम पाऊस झाला. यासह अनेक भागात पावसाची रिमझिम झाली. परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचा गहू जमिनीवर झोपला आहे.

    वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हा परिसर अंधारात होता. अचानक ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. शहर व परिसरात रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु होती. आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक रिमझिम पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणी सुुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस शक्यता जाणवत होती. सध्या आगास केलेली गहू, हरभरा, कांदा पिके काही भागात काढणीस आलेली आहे.

    त्यामुळे अवकाळी पाऊस झाला तर या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. दरम्यान, चालू वर्षी रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात थंडी पडली नाही तसेच सतत ढगाळ हवामान राहिल्याने अगोदरच सर्वच पिके रोगराईने ग्रासलेली आहे.
    यावर्षी मोठा खर्च औषध फवारणीवर झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका उत्पन्नातून जाणवणार आहे. असे असताना आता अवकाळीचे संकट आल्याने शेतकरी धास्तावला आहे.