अनेक महिन्यापासून मोहता मिल कामगार पगारापासून वंचित

मोहता मिलमधील फोल्डिंग आणि प्रोसेसिंग खात्यातील कामगारांचा ऑक्टोंबर २०२० महिन्यापासून पगार झाला नाही.

  • कामगारांनी माजी आमदार प्रा. तिमांडे यांच्यासमोर मांडल्या समस्या
  • कामगारमंत्री वळसे-पाटील यांच्याशी केला संपर्क

हिंगणघाट. मोहता मिलमधील कामगार अडचणीत सापडला आहे. यामुळे कामगारांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट घेत समस्या मांडल्या. त्यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी केली. लवकरच समस्या निकाली काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

मोहता मिलमधील फोल्डिंग आणि प्रोसेसिंग खात्यातील कामगारांचा ऑक्टोंबर २०२० महिन्यापासून पगार झाला नाही. डिसेंबर २०१९ पासून प्रोसेसिंग आणि फोल्डिंग खाते मनमर्जी बंद केलेले आहे. त्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही. झालेल्या बैठकीत कामगार कमिशनर नागपुर यांनी कामगारांना पूर्ण पगार देण्याचे आदेश दिले. परंतु, अजुनही त्यांना १६ डिसेंबर २०१९ पासून बेकायदेशीर लेऑफ (अर्धा पगार) देत आहे. पूर्ण पगार देण्याचे आदेशात नमूद आहे.
मिल कामगारांचे म्हणणे आहे की मिल चालू ठेवा नाहीतर कायदेशीर व्ही.आर.एस देण्यात यावे.

या सर्व मोहता मिल कामगारांच्या मागण्या त्वरित प्रशासनाने सोडविण्यात आल्या नाही तर कामगार सहकुटुंब आमरण उपोषणाला बसणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी मोहता मिल व्यवस्थापनाची व प्रशासनाची राहिल. संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करावे लागेल. याव्यतिरिक्त कामगारांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्रस्त आहोत तरी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, असे आवाहनही कामगारांच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी संजय रहाटे, सुनील देवताळे ,गजानन धात्रक,नाना हेडाऊ, नारायण शहारकर,
विष्णू पतरु, राजू भोंडे, दिलीप डहाके, चंद्रभान मायकलकार,हर्दिप काळे, दीपक फरदे आदी कामगार उपस्थित होते.