चिमुकलीचा गळा घोटून आईने केली आत्महत्या; पण ‘तिने’ इतके टोकाचे पाऊल का उचलले; जाणून घ्या नेमके कारण!

हिंगणघाट येथील संत तुकडोजी वाँर्ड आशीषनगर येथे वडील स्व. मनोज शेळके यांच्या निवासस्थानी कविता नरेंद्र मोहदुरे (वय 35) या विवाहितेने आपल्या तीन वर्षांच्या आराध्या या मुलीचा गळा घोटून मारले. त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

  हिंगणघाट (Hinganghat): काही दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या केल्यानंतर मानसिक आघात झालेल्या विवाहितेने तीन वर्षीय चिमुकलीचा गळा घोटून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वाँर्डातील आशीषनगर येथे गुरुवार 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. या हृदयद्रावक घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

  सविस्तर व्रत असे की, हिंगणघाट येथील संत तुकडोजी वाँर्ड आशीषनगर येथे वडील स्व. मनोज शेळके यांच्या निवासस्थानी कविता नरेंद्र मोहदुरे (वय 35) या विवाहितेने आपल्या तीन वर्षांच्या आराध्या या मुलीचा गळा घोटून मारले. त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर विवाहितेच्या पहिल्या पतीचे नाव दिनेश धोटे आहे. त्याच्यापासून तिला आराध्या ही तीन वर्षांची मुलगी होती. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने नरेंद्र मोहदुरे याच्याशी लग्न केले होते. ती वर्धा बोरगाव (मेघे) येथील गणेशनगरात पतीसोबत राहत होती.

  आठ दिवसांपूर्वीच तिचे पती नरेंद्र मोहदुरे यांनी मानसिक तणावातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर कविता मोहदुरे ही मुलीला घेऊन आठ दिवसांपूर्वीच आई मंदाबाई शेळके यांच्याकडे हिंगणघाट येथे राहायला आली होती. तिची आई मंदाबाई शेळके या बँकेत कामानिमित्त गेल्या होत्या. त्या दरम्यान, घरी कोणी नसल्याचे पाहून मानसिक आघात झालेल्या कविता हिने तीन वर्षांच्या मुलीला मारून आपली जीवनयात्रा संपविली. बँकेतून परत आल्यानंतर मंदाबाई यांना मुलगी आणि नात मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेने परिसर हादरून गेला आहे.

  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नोंद केली. सदर घटनेचा तपास ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे, पोहवा जीवन चौधरी हे करीत आहेत.

  आठ दिवसांपूर्वीच केली होती पतीने आत्महत्या
  या घटनेच्या आठ दिवसांपूर्वीच कविता मोहदुरे यांच्या पतीने मानसिक तणावातून वर्धा येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.