केंद्रातील मोदी सरकारमुळेच सोयाबीनला मातीमोल किंमत ! नाना पटोले

"देशात सोयाबिनचे भरघोस पीक होत असताना आणि चार पैसे हातात येण्याची आशा शेतकऱ्यांना दिसत असतानाच केंद्र सरकारने विदेशातून सोयाबीन आयात केले. केंद्राच्या या निर्णयामुळेच बाजारात सोयाबिनची किंमत मातीमोल झाली आहे."

    वर्धा : केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरीविरोधी असून त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच सोयाबिनचे भाव घसरले आहेत. देशात सोयाबिनचे भरघोस पीक होत असताना आणि चार पैसे हातात येण्याची आशा शेतकऱ्यांना दिसत असतानाच केंद्र सरकारने विदेशातून सोयाबीन आयात केले. केंद्राच्या या निर्णयामुळेच बाजारात सोयाबिनची किंमत मातीमोल झाली आहे,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

    विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

    प्रमोद शेंडे यांच्या आठवणींना उजळा देताना पटोले पुढे म्हणाले की, प्रमोदबाबू हे सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आग्रहाने मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करत असत. आज कापूस, सोयाबिनच्या घसरत्या किमती पाहून त्यांनी सरकारला जाब विचारला असता. शेतकऱ्यांवर प्रमोदबाबूंचा विशेष जीव होता, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी त्यांची भूमिका असायची. जनतेसाठी, लोकांच्या हितासाठी काम करणारे प्रमोदबाबूंचे व्यक्तीमत्व होते. महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगेबाबा यांचा विचार असलेल्या या भूमीत प्रमोदबाबूंचा पुतळा आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरले असे पटोले म्हणाले.

    यावेळी विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन मंत्री व पालकमंत्री सुनिल केदार, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री रणजित कांबळे, माजी मंत्री अनिस अहमद,आ. अभिजित वंजारी, माजी आमदार अमर काळे, शेखर शेंडे, अशोक शिंदे, सुरेश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.