Theft of three tonnes of oranges, which was reserved for the purpose of raising prices, was done by threatening the farm laborers

पहाटे ३ वाजताच्या सुमारास शेतात अज्ञात ५ जण आले. त्यांनी संत्राच्या ढिगाऱ्याजवळ शेतमजूर झोपलेला असताना त्याच्या चेहऱ्यावर चादर टाकून डांबून ठेवले. याबाबत तू मालकाला सांगू नको, तुला आम्ही काहीही करणार नाही, असे बजावण्यात आले.

    कारंजा : तालुक्यातील खरसखांडा येथील माजी सरपंच विकास नासरे यांच्या शेतात तोडून ठेवण्यात आलेल्या संत्रा ढिगाऱ्यातून पहाटे ३ वाजताच्या सुमारास टेम्पो वाहनात भरून तीन टन संत्रा चोरी करण्यात आला. शेतमजुराला डांबून ठेवून पाच चोरट्यांनी ही चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे.

    पहाटे ३ वाजताच्या सुमारास शेतात अज्ञात ५ जण आले. त्यांनी संत्राच्या ढिगाऱ्याजवळ शेतमजूर झोपलेला असताना त्याच्या खिशाची पाहणी केली. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर चादर टाकून डांबून ठेवले. याबाबत तू मालकाला सांगू नको, तुला आम्ही काहीही करणार नाही, असे बजावण्यात आले. चोरट्यांनी काही अंतरावर असलेले वाहन भ्रमणध्वनी करून बोलविले. यात हिंदी व मराठी भाषिक चोरटे असल्याचे सांगण्यात आले आहे. टेम्पो शेतात संत्रा ढिगाऱ्याजवळ आणून कॅरेटने संत्रा भरण्यात आला. जवळपास त्यांना दीड तास संत्रा भरायला लागला. शेतमजुराला डांबून जबरी चोरी करण्यात आली.

    शेतात संत्रा तोड सुरू आहे. त्यातील काही संत्रा नेण्यात आले होते. तर, जवळपास ५ टन संत्र्याचा शेतात ढिगारा लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शेतमजूर रखवालदार ठेवण्यात आला होता. त्याला डांबून त्याच्या डोळ्यादेखत टेम्पोमध्ये कॅरेट भरुन संत्रा चोरून नेण्यात आला. पहाटे शेतमजुराने संत्रा मालकाच्या घरी येऊन याबाबत माहिती दिली. याबाबत कारंजा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल माहूर करीत आहेत.

    भाववाढ मिळेल म्हणून होता राखून
    सध्या संत्र्याचे दर चांगले असून, संत्रा शेवटच्या टप्प्यात आला आहे. अनेकांनी संत्रा यापूर्वी विक्री केला आहे तर काही शेतकऱ्यांनी भाववाढ मिळेल, या आशेने काही संत्रा राखून ठेवला आहे. तीन दिवसांपासून शेतात तोड सुरू आहे. यातील काही संत्रा नेण्यात आला तर काही संत्रा वाहनात भरला नसल्याने शेतात ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी शेतमजूर रखवाली करण्यासाठी ठेवण्यात आला होता. तरीसुद्धा शेतातून संत्रा चोरून नेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संत्र्याला चांगला दर मिळत असल्याने संत्र्याची चोरी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

    शेतात आढळले टेम्पोच्या टायरचे मार्ग
    चोरट्यांनी टेम्पो चक्क शेतात ढिगाऱ्याजवळ आणून संत्र्याची चोरी केली. यावेळी शेतात वाहनाच्या टायरचे मार्ग आढळून आले आहे. कारंजा पोलिसांनी पंचनामा केला असून, या घटनेचा तपास सुरू केला आहे.