१३ क्विंटल सोयाबीनसह चोरांनी घरगुती सिलेंडरची चोरून नेले

    वर्धा (Wardha) : तुमच्या घरातले सिलिंडर आता जपून ठेवा, कारण चोरट्यांचा आता तुमच्या गॅस सिलिंडरवरही डोळा आहे. खातखेडा गावात अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्यात ठेवलेल्या सोयाबीनसह एक सिलिंडरही पळवल्याचे समोर आले आहे. पर्स, चेन, मोबाईल चोरींसह घरफोडी, दुकानातील चोरीच्या विविध घटना आपण दररोज ऐकतोच मात्र, आता यात भर करत चोरट्यांनी घरातून सिलिंडरचीदेखील चोरी करणं सुरू केलं आहे. वाढत्या महागाईमुळे सिलिंडरच्या किमतीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे किमती साहित्यांसह आता स्वयंपाकघरातील सिलिंडरलाही मोल आलयं.

    आधी सिलिंडरमधून गॅस चोरी व्हायची, पण आता चोरटे चक्क घरातून सिलिंडरच पळवू लागल्याचे समोर आले आहे. खातखेडा गावातील रहिवासी विष्णू जागोराव कांबळे यांच्या शेतात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गोठ्याच्या दाराचा कडी-कोयंडा तोडून गोठ्यात प्रवेश करीत १३ क्विंटल सोयाबीन चोरले. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जाताना स्वयंपाक घरातील एक सिलिंडरही पळवले. सोयाबीनसह सिलिंडर असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.