शिरपूर परिसरात शेतीचे नुकसान, वीजपुरवठा खंडित; जोरदार वादळवारा आणि गारांचा मारा

१९ मार्चच्या रात्री ९च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची धांदल उडाली. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे उन्मळून पडली, त्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता.

    शिरपूर जैन (Shirpur Jain).  १९ मार्चच्या रात्री ९च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची धांदल उडाली. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे उन्मळून पडली, त्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता.

    हवामान खात्याकडून काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र शुक्रवार ता. 19 मार्च रोजी रात्री अचानक आलेल्या वादळ वाऱ्याने पावसाने व गारपिटीमुळे अनेकांची धावपळ झाली. अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडाली तर कित्येकांच्या घरात पाणी घुसले. शेतकऱ्यांनी उकळून वाळत घातलेली हळद पाण्याने भिजल्याने मोठे नुकसान झाले, पपई, केळीच्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले. शेतातील कांदा पूर्णपणे झोपला असून गारपिटीने भाजीपाल्याचे देखील अतोनात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस, शेडनेट तुटून पडलेत.

    जागोजागी झाडे उन्मळून पडली असून विजेच्या तारावर महाकाय झाडे पडल्याने तारा तुटल्या. खांब वाकलेत, परिसरातील वीजपुरवठा रात्रभर बंद होता. वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांची शोध मोहिमेद्वारे रात्रभर भटकंती सुरू होती. सकाळी 10.30 वाजता पुन्हा वीज सुरू झाली. पाऊस व गारपिटीमुळे शिरपूर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अर्ध्या तासाच्या तांडवामुळे विविध संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.