ज्वारीचे फुटवे अधिक प्रमाणात खाल्याने १० गायींचा मृत्यू, तर ३० हून अधिक बेपत्ता

वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील (Manora taluka) भुली येथील दोन गुराखी आपल्या गायी (cows) चारत असताना यातील 50 हून अधिक गायींनी किसन बळीराम चव्हाण यांच्या शेतातील कोवळ्या ज्वारीचे फुटवे अधिक प्रमाणात खाल्ले. यामुळे गायींच्या शरीरात विष वाढून तब्बल 10 गायींचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मानोरा तालुक्यातील भुली (Bhuli) परिसरात घडली आहे.

    वाशिम (Washim).  जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील (Manora taluka) भुली येथील दोन गुराखी आपल्या गायी (cows) चारत असताना यातील 50 हून अधिक गायींनी किसन बळीराम चव्हाण यांच्या शेतातील कोवळ्या ज्वारीचे फुटवे अधिक प्रमाणात खाल्ले. यामुळे गायींच्या शरीरात विष वाढून तब्बल 10 गायींचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मानोरा तालुक्यातील भुली (Bhuli) परिसरात घडली आहे. याशिवाय 12 गायी अत्यवस्थ गायींवर औषधोपचार (undergoing treatment) सुरू आहेत.

    या ज्वारीच्या फुटव्यात मोठ्या प्रमाणात हायड्रोजन सायनाईट हा विषारी घटक असल्यामुळं विषबाधा होऊन 10 गायींचा जागीच मृत्यू झाला तर 12 गायींवर औषधोपचार सुरू आहेत. तसेच 30 पेक्षा जास्त गायी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. गायींच्या मृत्यूमुळं गोपालकांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. उन्हाळ्यातील चारा टंचाई मुळे जनावरांना खाण्यासाठी काहीच मिळत नाही. त्यातच जनावरांना जर थोड्या फार प्रमाणात हिरवळ दिसली की ते खाण्यासाठी तुटून पडतात.

    अशीच एक घटना आज वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील भुली शेतशिवारात घडली. गावातील नितीन राठोड आणि प्रेमसिंग राठोड या दोन गुराख्यांकडे परिसरातील 100 ते 150 गायी चरण्यासाठी आहेत. आज हे दोघे गायीचा कळप चरण्यासाठी घेऊन गेले होते. भुली शेतशिवारात किसन बळीराम चव्हाण यांच्या चार एकर शेतात ज्वारी पेरली होती. तिची काढणी झाल्यानंतर त्या ज्वारीला हिरवी पाने फुटवे आली आहेत. याच कळपातील गायी या हिरवळ दिसल्यानं त्या शेतात घुसल्या व त्यातील 50 हुन अधिक गायीनी ज्वारीची हिरवे फुटवे मोठ्या प्रमाणात खाल्ले. त्यामुळं विषबाधा होऊन 10 गायीचा घटस्थळीच मृत्यू झाला तर 12 अत्यवस्थ गायींवर औषधोपचार सुरू आहेत.

    कोवळ्या फुटव्यात मोट्या प्रमाणात हायड्रोजन सायनाईट हा विषारी घटक असल्यामुळे ज्या जनावरांनी मोठ्या प्रमाणात ते खाल्ले तर विषबाधा होऊन त्यातच जनावरांचा मृत्यू होतो. मृत पावलेल्या गायीमध्ये जगन पवार, सुनील चव्हाण, राजू पाटील, नरेश चव्हाण, अरविंद चव्हाण, शंकर राठोड, किसन राठोड, अनिल राठोड, विजय चव्हाण, सुरेश चव्हाण यांच्या प्रत्येकी एका गायीचा समावेश आहे. अत्यवस्थ गायीवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवन चव्हाण हे उपचार करीत आहेत. कळपातील 30 हून अधिक गायी बेपत्ता असल्याने गोपालक आपल्या गायींचा शोध घेत आहेत.

    कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेमुळे गोपालकांवर एक नवीनच संकट ओढवल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. त्यासाठी पशु संवर्धन विभागाने पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी डॉ. श्याम जाधव यांच्यासह गोपालकांनी केली आहे. शेतकरी शेतीसोबत जोड धंदा म्हणून गायी पाळतात. मात्र आकस्मिक संकटानं 10 गायीचा मृत्यू झाल्यामुळं भुली परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.