अवैध प्रवासी वाहतूक जोमात; दुचाकीधारकांवर कारवाईचा सपाटा

जिल्ह्यात दररोज वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर नियम लागू केले. तरीही कोरोनाचा कहर वाढत असताना अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला आहे. कोरोना नियमांची पायमल्ली केली जात आहे.

    वाशीम (Washim).  जिल्ह्यात दररोज वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर नियम लागू केले. तरीही कोरोनाचा कहर वाढत असताना अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला आहे. कोरोना नियमांची पायमल्ली केली जात आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

    जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाचा प्रकोप वाढीस लागला असून मागील पंधरा दिवसात तीन हजारांवर रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर सुमारे 20 जणांना जीव गमवावा लागला. दरदिवशी वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले असले तरी, त्याची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र आहे.

    विशेष बाब म्हणजे एसटी प्रवासी व खासगी वाहनधारकांना प्रवाशी मर्यादा घालून दिलेली असताना शहरात याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. खासगी वाहने व ऑटोमधून मर्यादेपक्षा प्रवाशी कोंबण्यात येत असून मास्कचा वापर देखील केला जात नसल्याचे दिसून येते. शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या व मास्क न वापरल्याचे कारण पुढे करून 500 रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र, ऑटो रिक्षामधून मर्यादेपेक्षा अधिक होणाऱ्या वाहतुकीवर संबंधित विभागाचे बंधन नसल्याने अवैध प्रवासी वाहतूक जोमाने सुरू आहे. त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीला सूट आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

    गर्दी टाळण्याच्या हेतूने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाजार सुरू ठेवण्यास मुभा असून सायंकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची नियमांवर बोट ठेवून अडवणूक केली जाते. तर दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीकडे कानाडोळा केल्या जात असल्याने कोरोना नियम केवळ दुचाकी स्वारांना आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.