वाशीम जिल्ह्यात एलसीबीची छापेमारी; पोलिस अधीक्षकांचे कारवाईचे निर्देश

वाशीम जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिल्यानंतर एलसीबी Action मोडमध्ये आली आहे. कारंजा शहरातील गवळीपुरा भागात अवैध गावठी हातभट्टी दारू उत्पादकांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या पथकाने कारवाई केली.

    वाशीम (Washim).  अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिल्यानंतर एलसीबी Action मोडमध्ये आली आहे. कारंजा शहरातील गवळीपुरा भागात अवैध गावठी हातभट्टी दारू उत्पादकांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या पथकाने कारवाई केली. तीन पथकांनी गवळीपुरा भागात वेगवेगळ्या ठिकाणी 3 कारवाया केल्या.

    यामध्ये गवळीपुरा भागातील इस्माईल मदन गारवे (वय 40) याच्या ताब्यातील 24 हजार रुपयांचा, कालू निमसुरवाले (वय 55) याच्या ताब्यातून हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा 70 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच छटु रमजान नौरंगाबादी (वय 58) याच्या ताब्यातून 45 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
    तसेच तीन इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मागील आठ दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वाशीम रिसोड, अनसिंग, मंगरूळपीर व आसेगाव ठाण्याच्या हद्दीत देशी विदेशी दारूच्या पाच कारवाया करून 3962 रुपयाचा देशी विदेशी दारूचा माल नष्ट केला आहे. तसेच 18 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव हद्दीत ग्राम पांगराबंदी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख व जुगार साहित्य असा 14,460 चा मुद्देमाल जप्त केला.

    एकूण पाच इसमाविरूद्ध मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोलिस उप निरीक्षक शब्बीर खान पठाण, सहायक पोलिस उप निरीक्षक नारायण जाधव, अमोल इंगोले, सुनील पवार, राजेश राठोड, मुकेश भगत, राजेश गिरी, प्रवीण राऊत, किशोर खंडारे, राम नागुलकर, संतोष शेणकुडे व रमेश थोरवे तसेच आर.सी.पी.च्या पोलिस अंमलदारांनी केली.