गौण खनिज उत्खननप्रकरणी दंड; दंडाची रक्कम ३.५३ कोटी

तसेच या जमिनीतील 80 ते 90 सागवान झाडे तोडण्यात आली. सदर जमिनीच्या अंदाजे 0.50 आर. हेक्टर क्षेत्रातून गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

    मालेगाव. समृद्धी महामार्गासाठी अवैध गौण खनिजाचे उत्खनन केल्याची तक्रार सुभाष आंधळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत जिओ व अ‍ॅपको कंपनी दोषी आढळल्याने संबंधित कंपनीच्या कंत्राटदारांना 3 कोटी 53 लाख 16 हजार 480 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम तीन दिवसांच्या आत भरण्याचे आदेशही तहसीलदार काळे यांनी दिले आहेत.

    प्राप्त माहितीनुसार, सुभाष राजाराम आंधळे यांनी तहसीलदार मालेगाव यांच्याकडे तक्रार दिली होती की, जऊळका रेल्वे येथील गट क्रमांक 236 मध्ये त्यांची शेतजमीन आहे. या शेत जमिनीमधून समृद्धी महामार्गाच्या रस्ता कामासाठी अ‍ॅपको एंटरप्राईजेस व जिओ इंटरप्राईजेसच्या वतीने कंत्राटदार चौधरी यांनी बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन केले. तसेच या जमिनीतील 80 ते 90 सागवान झाडे तोडण्यात आली. सदर जमिनीच्या अंदाजे 0.50 आर. हेक्टर क्षेत्रातून गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

    तक्रारीवरून तहसीलदारांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव व उपअधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव यांना प्रकरणात मोजमाप करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. दोघांनी जऊळका रेल्वे परिसरातील गट क्रमांक 236 मधील 0.86 हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण 55,18,020 ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याबाबतचा अहवाल तहसीदारांककडे सादर केला. या अहवालावरून व चौकशीतून कंत्राटदारांनी अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचे दिसून आले. त्यानुसार तहसीलदार रवी काळे यांनी जमीन महसून अधिनियमाच्या कलमानुसार जिओ इंटरप्राईजेस व अ‍ॅपको कंपनीला तीन कोटी 53 लाख 16 हजार 480 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम तीन दिवसाच्या आत शासकीय खजिन्यात भरणा करण्याचे आदेश दिले आहेत.