रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन करणार; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा

वाशीम शहरातील नंदीपेठ प्रभागासमोरील अनेक दिवसापासून नादुरुस्त असलेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली. मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर यांच्या मार्गदर्शनात शहर संघटक गजानन धोंगडे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    वाशीम (Washim).  शहरातील नंदीपेठ प्रभागासमोरील अनेक दिवसापासून नादुरुस्त असलेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली. मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर यांच्या मार्गदर्शनात शहर संघटक गजानन धोंगडे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सोबतच रस्ता दुरुस्ती न झाल्यास नगरपरिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील जुन्या नगरपरिषदेमागे असलेल्या नंदीपेठ दर्शनी गेटजवळील रस्ता दुरुस्त करून येथील नागरिकांना दिलासा द्यावा. या मागणीसाठी 9 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु या निवेदनाला एक महिना उलटून गेला तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याठिकाणी केवळ गिट्टी व दगड आणून टाकलेले आहेत. त्यामुळे गिट्टी व दगडामुळे या ठिकाणावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे याठिकाणी अनेक अपघात सुध्दा घडले आहेत. रहिवासी व वाहनधारकांचा त्रास पाहता रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे.

    अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदन देताना विद्यार्थी सेना सरचिटणीस अमोल गाभणे, मनसे सैनिक मोहन कोल्हे, पदाधिकारी राजु किडसे, आंबा सोनटक्के, सुहास जाधव, वेदांत ढवळे, निखिल बुरकुले, विठ्ठल राठोड, नितेश खडसे, मनसे सैनिक समाधान खरे, आनंदवाडी शाखाध्यक्ष राजू शिराळ, शाखा उपाध्यक्ष विनोद सरकटे, ज्ञानेश्वर खरे, अक्षय मोरे, पवन खरे, देवानांद खरे, गजानन मुखमाले, नितीन कदम, मंगेश गायकवाड, सागर खरे आदी उपस्थित होते.