‘या’ व्यक्तीच्या एका आवाजावर गाई धावत येतात; जनावरांनाही कळते मानवी आवाजातील मर्म

गाईंची देखभाल ते स्वतः करतात. भर उन्हाळ्यातही गाईंना हिरवा चारा दिला जातो. दिवसभर चराई करून दमलेल्या आई मात्र पवन जयस्वाल यांच्या भेटीच्या आशेने अक्षरश: धावून येतात हे विशेष, वेगळ्या दिशेने जाणारा कळप त्यांचा आवाज ऐकताच हंबरडा फोडत त्यांचे जवळ धावून येतो.

    यवतमाळ (Yavatmal) : पुराणात गायीला मातेचे स्थान आहे. ती पर्यावरणपूरक आहे तसेच जीवनदायीनी पण. त्यामुळे गाय घरांघरात पाळली जात होती. अलीकडे गुरांना पोसणे गोपालकांना फार कठीण झाले आहे. त्यामुळे जनावरे मोकाट सोडली जातात. वांझ, लंगड्या, लुळ्या, म्हाताऱ्या गाईचे माहेरघर म्हणजे श्री संत उद्धव बाबा गोरक्षण घाम, नेरचे नगर उपाध्यक्ष गोरक्षक पवन जयस्वाल हे अशा गाईचे जणू पालकच आहेत. अशा मोकाट, आजारी, वृद्ध, अपंग असलेल्या गायींना कत्तलखान्यात न जाऊ देता त्यांचे पालनपोषण पवन जयस्वाल करतात.

    पूर्वी गाय असलेले घर समृद्ध समजले जायचे. पण आता आर्थिकदृष्ट्या गाय पोसणे कठीण झाले आहे. त्यामुळे गोधनात कमालीची घट झाली. काही जनांनी गायी कत्तलखान्यात दिल्या. ज्यांना आपण पूजतो, अशा गो मातांना कत्तलखान्या पाठविणे संवेदनशील मनाला पटत नाही. या गोरक्षणात जवळपास साडे चारशे गायी आहेत. त्यांचे पवन जयस्वाल पालक आहेत. या गाईचा त्यांच्यावर व त्यांचा गाईवर अगाध जीव आहे. दररोज आस्थेने सर्व गायींची ते काळजी घेतात. आजारी गाईना वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. दुर्बल व आजारी गाईची विशेष काळजी घेतली जाते. गायींना दररोज ढेप खुराक आदी पोषक तत्वे दिली जातात. गायींच्या चाऱ्यांसाठी त्यांनी पाच एकरांत चाऱ्यांची लागवड केली आहे.

    या गाईच्या देखभालीसाठी दहा माणसांची चमू कार्यरत आहे. चार माणसे गार्इंच्या कळपामागे, दोन जण गोठ्याची स्वच्छता करण्यासाठी, तर उर्वरित चाऱ्यांची व्यवस्था करणे, गायींचे संगोपनासाठी काम करतात. श्री क्षेत्र मानकी आंबा येथे श्री संत उद्धव बाबा यांचे भव्य मंदिर आहे. भाविक भक्तांनी मांदियाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. वीस वर्षे आधी परिसरातील लोकांनी संस्थानात गायी आणून सोडल्या होत्या. त्यांचे संगोपन त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या गाईना नेर येथील यांच्या शेतात आणून त्याचे पालन पोषण केले. हळूहळू तालुक्यातील शेकडो नागरिकानी गाई याठिकाणी आणून सोडून दिल्या. ही संख्या तब्बल साडे चारशे वर पोहोचली आहे. बारा हजार चौरस फुटात सुसज्ज गोठा निर्माण केला आहे.

    गाईंची देखभाल ते स्वतः करतात. भर उन्हाळ्यातही गाईंना हिरवा चारा दिला जातो. दिवसभर चराई करून दमलेल्या आई मात्र पवन जयस्वाल यांच्या भेटीच्या आशेने अक्षरश: धावून येतात हे विशेष, वेगळ्या दिशेने जाणारा कळप त्यांचा आवाज ऐकताच हंबरडा फोडत त्यांचे जवळ धावून येतो. मुक्या जनावरांची तनमनाने केलेल्या सेवेमुळे त्यांची गायींशी नाळ जुळली आहे.

    मातृत्वाचा झरा सर्वांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने सर्व गाई एकत्र राहत असल्याने त्यांच्यात अंतर्गत नातं जुळली आहे. एकच वेळी दुधाळ गाई व इतर गाई वासरे ही दुधाचा अमृत झरा स्वच्छंदपणे पितात. ही आपुलकीची व मायेने ओतप्रोत असलेली अभूतपूर्व अशी घटना या ठिकाणी पहायला मिळते.