ट्रकचालकाची दगडाने ठेचून केली हत्या; ट्रक २ किलोमीटरवर बेवारस सोडून मारेकरी फरार

चिल्ली व सुकळी गावाच्या २ किलोमीटर अंतरामध्ये रस्त्याच्या कडेला अज्ञात आरोपींनी हत्या करून मृतदेह फेकून दिला आणि आरोपीने ट्रक पळवुन घटनास्थळावरून किमान एक किलोमिटर अंतरावर जावून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करुन पसार झाला.

    यवतमाळ (Yavatmal) : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या एका ट्रकच्या चालकाची दगडाने ठेचून हत्या करून रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला. ही घटना मध्यरात्री दरम्यान येथून जवळच असलेल्या महामार्गावरील चिल्ली गावच्या शिवारात घडली.

    पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरदीप कुमार ( बिहार राज्य ) असे मृतक चालकाचे नाव असून त्याने रायपुर येथून ट्रक क्रमांक सीजी o७ अे एक्स 3७७२मध्ये कोळसा भरून संगमेश्वर येथे जात होता. दरम्यान चिल्ली व सुकळी गावाच्या २ किलोमीटर अंतरामध्ये रस्त्याच्या कडेला अज्ञात आरोपींनी हत्या करून मृतदेह फेकून दिला आणि आरोपीने ट्रक पळवुन घटनास्थळावरून किमान एक किलोमिटर अंतरावर जावून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करुन पसार झाला.

    पोलिस तपासात ट्रकच्या मालकाने तो चालक एकटाच ट्रक नेत असल्याचे सांगण्यात आल्याने नेमका त्या चालकाची हत्या कुणी व का केली? असा प्रश्न समोर आल्याने या खुन प्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान उमरखेड पोलिसांसमोर आहे . घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते मात्र श्वान घटनास्थळीच गुरफटले. दरम्यान घटनास्थळी स्थानिक गून्हे शाखेच्या पथकांनी भेट देवुन तपासाची चक्रे फिरवली . पुढील तपास ठाणेदार अमोल माळवे, पीएसआय पांचाळ, तोगरवाड करीत आहेत.