जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा तहकूब; अध्यक्षांच्या खुर्चीवर फेकली शाई

    यवतमाळ (Yavatmal) : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने संतापलेल्या माजी उपाध्यक्षाने थेट अध्यक्षांच्या कक्षात शिरून त्यांच्या खुर्चीवर शाई फेकली. ही घटना गुरुवारी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास घडली. गुरुवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी १ वाजता होणाऱ्या सभेला केवळ दोन सदस्य उपस्थित होते.

    अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतरही गणपूर्ती झाली नाही. त्यामुळे सभेचे सचिव अरविंद गुडधे यांनी सभा तहकूब झाल्याचे घोषित केले. यामुळे संतापलेल्या माजी उपाध्यक्षाने लगेच अध्यक्षांचा कक्ष गाठून त्यांच्या खुर्चीवर शाई फेकली. ही शाई आजूबाजूच्या प्रतिमांवरही उडाली. त्यानंतर ते निघून गेले. सीईओ, डेप्युटी सीईओ आदींनी या घटनेची पाहणी केली. महाराष्ट्र आणि जिल्हा परिषदेत सत्ता गमावल्यामुळे भाजप सदस्याने नैराश्यातून केलेले हे कृत्य निंदनीय असल्याचे अध्यक्ष कालिंदा पवार यांनी म्हटले आहे.

    खुर्चीवर शाई फेकताना ती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि राष्ट्रीय ध्वजावरसुद्धा उडाली. त्यामुळे राष्ट्रध्वज व शिवरायांचा अपमान झाल्याने आपण या घटनेचा निषेध करीत असल्याचे कालिंदा पवार यांनी सांगितले.