वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी; मुळधार पावसात गावावर छापेमारी; घबाड पाहून वन्यदलही चक्रावले

संशयित साखर झोपेत असताना ताब्यात घेतले आणि त्यांना बोलते केले. वनविभागाचा फौजफाटा बघून गावात एकच खळबळ उडाली. यवतमाळ वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 469 किटा बीट वाघापूर राऊंडमध्ये दोन वर्षांपूर्वी वन्यजीवाचा सांगाडा आढळून आला होता. काही जणांनी त्यांना मिळेल ते अवयव घेऊन आपापले घर गाठले होते.

  यवतमाळ (Yavatmal) : गेल्या आठवडाभरापूर्वी नागपूर जिल्ह्यात व्याघ्र अवयव तस्करप्रकरणात (tiger organ smuggling) एका टोळीला जेरबंद करण्यात आले होते. तेच कनेक्शन पकडून वनविभागाच्या पथकाने (the Forest Department) किटा गावातील (Kita village) पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वन्यप्राण्याची नखे, हाडे आदी अवयव (Nails, bones and other organs of wild animals) जप्त करण्यात (seize) आले. नागपूर व यवतमाळ येथील वनविभागाच्या संयुक्त पथकाने रविवारी (ता.17) पहाटे दरम्यान ही कारवाई केली. त्यामुळे परिसरातील गावात एकच खळबळ उडाली आहे.

  संतोष कुंभेकर (वय 19), विनोद देवकर (वय27), प्रदिप बोरकर (वय19), लक्ष्मण कवाने (वय 19), जगदीश डुकरे (वय27, सर्व रा. किटा) अशी संशयितांची नावे आहे. गेल्या आठवड्यात नागपूर-वर्धा मार्गावर असलेल्या हळदगाव टोलनाक्यावर सापळा रचून वाघांच्या अवयवाची तस्करी करणार्‍या टोळीला अटक केली होती. यात यवतमाळ जिल्ह्यातील दोघे जण वनविभागाच्या हाती लागले होते. त्यामुळे व्याघ्र तस्करीशी यवतमाळ कनेक्शय असल्याचा संशय बळावला होता. तोच धागा पकडून नागपूर व यवतमाळच्या पथकाने रविवारी पहाटेच्या अंधारात धुव्वाधार पाऊस कोसळत असताना किटा गावात धडक दिली. इचोरी, कामनदेव, तिवसा येथील काही जण संशयाच्या भोवर्‍यात आहेत.

  संशयित साखर झोपेत असताना ताब्यात घेतले आणि त्यांना बोलते केले. वनविभागाचा फौजफाटा बघून गावात एकच खळबळ उडाली. यवतमाळ वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 469 किटा बीट वाघापूर राऊंडमध्ये दोन वर्षांपूर्वी वन्यजीवाचा सांगाडा आढळून आला होता. काही जणांनी त्यांना मिळेल ते अवयव घेऊन आपापले घर गाठले होते. किटा येथील एका संशयिताच्या नातेवाइकाच्या हाती काही अवयव लागले आणि तो यापूर्वीच जाळ्यात अडकला होता. नागपूर वनविभागाच्या पथकाने पाचही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

  त्यांच्याकडून नखे व हाडे जप्त केली. घटना जुणी असल्याने वन्यप्राण्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे सांगता येत नसल्याने वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. ही कारवाई उपवनसंरक्षक केशव वाभळे, सहायक वनसंरक्षक अनंता दिघोडे, सर्वश्री वनपरिश्रेत्र अधिकारी शंकर मडावी, अमर सिडाम, प्रशांत बहादुरे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.

  नागपूर व यतमाळच्या पथकाने संयुक्तरीत्या किटा येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नखे व हाडे जप्त करण्यात आली. वन्यप्राणी वाघ की बिबट हे अजून स्पष्ट झाले नाही. तपासणीसाठी अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत.

  केशव वाभळे, उपवनसंरक्षक, वनविभाग, यवतमाळ.