सिकलसेलचा रुग्ण असल्याने उपचार करण्यास डॉक्टरांचा नकार आणि शेवटचा श्वास

संजय दरांडेचा मृत्यू होताच त्याचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी दोषी डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत रुग्णालयातच आंदोलन सुरू केले.

  यवतमाळ (Yavatmal) : दोन डॉक्टरांच्या वादामुळे एका रुग्णाचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शनिवारी झालेल्या या धक्कादायक घटनेने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करीत नातेवाइकांनी अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. तणाव वाढत असल्याचे बघून अधिष्ठाता व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवळले. याचदरम्यान दोन अन्य रुग्णांचाही मृत्यू झाला.

  शनिवारी सायंकाळी संजय विलास दरांडे (वय १६) या सिकलसेल आजारामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला घेऊन त्याची आई रत्नमाला दरांडे रुग्णालयात गेल्या. मुलाला लवकर दाखल करून घ्या, म्हणत त्यांची डॉक्टरांकडे विनवणी सुरू होती. त्याचदरम्यान मेडिसिन विभागातील डॉक्टर व सर्जरी विभागातील डॉक्टरांमध्ये रुग्ण कोणाचा, यावरून वाद सुरू झाला. मेडिसिन विभागातील डॉक्टर सिकलसेलचा रुग्ण मेडिसिनमध्ये येत नाही, त्याला सर्जरी विभागात भरती करा असे सांगत होते. सर्जरी विभागात सिकलसेल रुग्णांवर आम्ही उपचार करीत नाही, असे म्हणून आपली जबाबदारी झटकत होते. दोन डॉक्टरांच्या वादात संजय दरांडे याची प्रकृती खालावली.

  पहाटे त्याला रक्ताची उलटी झाली. रविवारी सकाळी संजयचा मृत्यू झाला. यादरम्यान रुग्णालयातील दोन रुग्णांचाही मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली पण लेखी तक्रार केली नाही. संजय दरांडेचा मृत्यू होताच त्याचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी दोषी डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत रुग्णालयातच आंदोलन सुरू केले.

  रुग्णालयात तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे व शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर रुग्णालयात पोहोचले त्यांनी दरांडे कुटुंबियांची समजूत घातली. अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी चौकशी समिती नेमल्याचे सांगितल्यावर तणाव निवळला. त्यानंतर नातेवाईकांनी संजयचा मृतदेह ताब्यात घेऊन रविवारी दुपारी अंत्यसंस्कार केले.

  संजय दराडे याच्या मृत्यूबाबत त्याच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुखांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमली असून त्यांचा अहवाल आल्यावर संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल.
  — डॉ. मिलिंद कांबळे अधिष्ठाता