विजेचा धक्का लागून आजी, आजोबासह नातवाचा मृत्यू; दारव्हा तालुक्यात शोककळा

डोल्हारी येथे मारोतराव सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावर शेत आहे. शेतामध्ये त्यांनी हरभऱ्‍याची पेरणी केली. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात तिघे जण गेले होते. शेतातील लाइटजवळ मारोतराव यांना विजेचा धक्का लागल्याने ते ....

    दारव्हा (Darvha) : तालुक्यातील डोल्हारी (Dolhari) येथे शेतात विजेचा धक्का लागून आजी, आजोबासह नातवाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ५) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे डोल्हारी परिसरात शोककळा पसरली आहे. मारोतराव सुरदसे (वय ७०), पत्नी मनकर्णाबाई सुरदसे (वय ६५) आणि त्यांचा नातू सुमित विनोद सुरदसे (वय १६) अशी एकाच कुटुंबातील मृतांची नावे आहेत.

    तालुक्यातील डोल्हारी येथे मारोतराव सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावर शेत आहे. शेतामध्ये त्यांनी हरभऱ्‍याची पेरणी केली. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात तिघे जण गेले होते. शेतातील लाइटजवळ मारोतराव यांना विजेचा धक्का लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना वाचविण्यासाठी पत्नी मनकर्णाबाई यांनी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का लागला. आजी-आजोबांना जमिनीवर पडलेले पाहून शेतात असलेला नातू सुमित हा त्यांच्याकडे धावला. तेव्हा त्यालाही विजेचा जोरदार धक्का लागला.

    मन हेलावून टाकणाऱ्‍या या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृत्यूची नोंद घेतली. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तपास पोलिस करीत आहेत.