Zilla Parishad will be involved in FD scam; Recovery of Rs 25 lakh from employees

जिल्हा परिषदेत गाजलेल्या या लघु सिंचन विभागातील प्रकारानंतर असाच प्रकार बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातूनही समोर आला आहे.

    नागपूर : जिल्हा परिषदेत नानक कन्स्ट्रक्शन या कंत्राटदारांकडून एफडीचा गैरप्रकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणाच्या चौकशीअंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. एक कर्मचाऱ्याला निलंबित केले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांकडून २५ लाख रुपयांची वसुली सुद्धा केली जाणार आहे.
    जिल्हा परिषदेत गाजलेल्या या लघु सिंचन विभागातील प्रकारानंतर असाच प्रकार बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातूनही समोर आला आहे. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत प्रकल्प संचालक विवेक इमले यांच्या अध्यक्षेतेखाली सात सदस्यांची चौकशी समिती नेमली होती.  
    या समितीने आपले काम करत मागील दोन वर्षात २०२ फाईल तपासल्या, यात बांधकाम विभागाच्या ९३, लघु सिंचन विभागाच्या ५६, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या २८, सर्व शिक्षण विभागाच्या २३ तर आरोग्य विभागाच्या २ अशा फाईलचा समावेश होता. याच समितीच्या अहवालाच्या आधारावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. 
    या घोटाळ्यातील रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. तर, जिल्हा परिषदेला २९ कोटींची रक्कम मिळाली असती. जिल्हा परिषदेचे २९ कोटींचे झालेले नुकसान याच कर्मचाऱ्यांकडून वसूल केले जाणार आहे. तसेच, बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून १२ लाख ७५ हजार, लघु सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून १२ लाख ५९ हजार,  ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडून ३ लाख ५० हजाराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. तसेच, या तिन्ही विभागाच्या कार्यकारी अभियंतांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.