चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सतर्कता गरजेची; ग्राम सुरक्षा दल अन् पोलीस मित्रांना कार्यन्वित करण्याची आवश्यकता

शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोऱ्यांना आळा घालण्यासाठी परिसरात पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांच्या मदतीने गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

  घरफोड्या, दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ

  शिक्रापूर जवळील अनेक गावांमध्ये मोबाईल व दुचाक्या चोरींच्या घटना नियमित व सर्रास घडत आहेत. त्यात आता घरफोड्या व दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील आरोपी पकडणे पोलिसांना शक्य झालेले नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  यापूर्वी काही वर्षांपूर्वी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे असलेल्या प्रभारी पोलीस निरीक्षकांनी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल तसेच पोलीस मित्र संघ स्थापन करत प्रत्येक गावातून स्व खुशीने पोलिसांना मदत करणाऱ्या युवकांचे संघटन करुन त्यांना रात्र गस्तसाठी प्रवृत्त केले होते. वारंवार त्यांच्याशी संपर्कात राहून गावासह गावातील वस्त्यांचे चोऱ्यांपासून संरक्षण झाले होते.

  रात्रगस्तीमुळे चोरटे जाळ्यात अडकले होते

  यापूर्वी पोलीस मित्रांकडून सुरु असलेल्या रात्रगस्ती दरम्यान अनेक चोरटे व आरोपी देखील जाळ्यात सापडले होते. परंतु, अलीकडील काही काळामध्ये पोलिसांचा नागरिकांशी असलेला सुसंवाद काही प्रमाणात दुरावला आहे. त्यामुळे नागरिक देखील पुढे येत नाहीत. ग्राम सुरक्षा दल तसेच पोलीस मित्र संघ देखील नाहीसा झाल्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी नागरिक आपल्या परिसराचे रक्षण करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आहेत, परंतु चोऱ्यांच्या घटना वाढू लागल्याने पोलिसांसह नागरिकांनी देखील सतर्क राहणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

  चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य

  चोरांकडून चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांकडून बंद घरे, काही दिवस बंद असलेली घरे तसेच लोकवस्तीपासून लांब असलेली घरे तसेच दुकाने लक्ष्य करुन त्याच ठिकाणी चोऱ्या करण्यात येत आहेत.

  पाबळ औट पोस्टच्या हद्दीमध्ये चोऱ्यांच्या घटना वाढू लागल्या असल्याने त्या ठिकाणी ग्राम सुरक्षा दले स्थापन केले आहे. त्या माध्यमातून युवकांच्या मदतीने गस्त घालण्याचे काम सुरु आहे.

  - नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक.