मुंबई पोलिसांना सतर्कचे आदेश; बंडखोर आमदारांच्या घरावर हल्ल्याची भीती

बंडखोरीमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या बंडखोर आमदारांना शिवसैनिक लक्ष्य करू शकतात, असा राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. गृह विभागाने पोलिसांना कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज राहावे अशी सूचना केली आहे.

    मुंबई : बंडखोरीच्या (Rebellion) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना सतर्क (Mumbai Police Alert)  राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला (Varsha Bunglow) सोडल्यानंतर ते मातोश्रीवर (Matoshree) दाखल झाले आहेत. त्यानंतर आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गृह विभागाने पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

    शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाले आहे. जवळपास ३५ ते ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता मूळ शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. या बंडखोरीमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या बंडखोर आमदारांना शिवसैनिक लक्ष्य करू शकतात, असा राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. गृह विभागाने पोलिसांना कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज राहावे अशी सूचना केली आहे.

    एकनाथ शिंदे हे आपला नवा गट स्थापन करण्याऐवजी आपलाच गट हा शिवसेनेचा मूळ गट आहे, असा दावा करण्याची शक्यता आहे. त्यांनी आता प्रतोदपदावर भरत गोगावले यांची नियुक्ती केली असून विद्यमान प्रतोद सुनील प्रभू यांची हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.