मुरुड- मुंबई मार्गावरील विहूर पूल कमकुवत; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

मागील पावसातच मुरुड तालुक्यामधील काशीद चिकणी पूल व विहूर पूल कमकुवत झाले होते. या वेळी त्यांची फक्त डागडुगी करून वाहतूक सुरु करण्यात आली, परंतु सध्या पावसाळा सुरु झाला आहे. तरीसुद्धा हे दोन्ही पूल दुरुस्त व मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.

  मुंबई : मुरुड तालुका हे पर्यटनस्थळ असून येथे मुरुड काशीद समुद्र किनाऱ्याबरोबरच सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला सुद्धा आहे. येथे असंख्य पर्यटक आपल्या वाहनाने मुरुड येथे भेट देत असतात. मागील पावसाळ्यात काशीद येथील पूल कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सदरचा पूल कमकुवत असूनसुद्धा या ठिकाणची वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. अपघात झाल्यावर हा वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने तातडीने हा पूल काही दिवसांत बनवण्यात आला.

  मागील पावसातच मुरुड तालुक्यामधील काशीद चिकणी पूल व विहूर पूल कमकुवत झाले होते. या वेळी त्यांची फक्त डागडुगी करून वाहतूक सुरु करण्यात आली, परंतु सध्या पावसाळा सुरु झाला आहे. तरीसुद्धा हे दोन्ही पूल दुरुस्त व मजबुतीकरण करणे आवश्यक असताना सुद्धा बांधकाम खात्याने अजिबात या पुलांकडे गंभीरतेमुळे न पाहिल्याने अजूनही हे पूल धोकादायक स्थितीत असून केवळ अधिकारी वर्गाच्या निष्क्रियतेमुळे पूल धोकादायक असताना सुद्धा प्रवासी वर्गाला प्रवास करावा लागत आहे.

  संरक्षक भिंतही वाहून गेली

  विहूर पुलाची संरक्षक भिंत कॉक्रिटीकरण करणे खूप आवश्यक होते. कारण मागील वर्षी मुरुड तालुक्यात २८०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. जास्त पाऊस पडल्यामुळे आजूबाजूंच्या नद्यांचे पाणी प्रचंड वेगाने विहूर पुलाच्या खालून वाहिल्याने या पुलाची माती निघून जाऊन व पुलाच्या बाजूकडील संरक्षक भिंत सुद्धा वाहून गेली. पावसाळा संपला तेव्हा या पुलाची दुरुस्ती होणे आवश्यक होते, परंतु दुर्लक्ष्य करून लोकांना त्रास देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करीत आहे. सध्या पाऊस सुरु झाला तरी विहूर पुलाची दुरुस्ती व संरक्षक भिंतीचे काम सुरु झालेले नाही.

  पर्यटनावरही परिणाम होत आहे

  हा पूल बंद झाल्यास मुंबई-मुरुड ही वाहतूक बंद होऊन सर्व वाहतूक भालगाव मार्गे रोहा या मार्गाने वळवावी लागते. त्यामुळे पर्यटनावर सुद्धा परिणाम होत असतो. विहूर पुलाची संरक्षक भिंत बांधण्याचे काम टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. फक्त मातीचा भराव टाकण्यात आलेला आहे, परंतु ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल तेव्हा ही माती वाहून जाऊन पुन्हा वाहतूक बंद होईल, अशी भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापन सभा मुरुड तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होऊनसुद्धा धोकादायक पुलांबाबत कोणतीही गंभीरता घेण्यात न आल्याने भविष्यात पूल असेच राहणार का, असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

  पावसाळा आला तरी काम सुरू नाही

  मुंबई मुरुड महामार्गावर काशीद चिकणी पूल व विहूर पूल हे महत्त्वाचे असताना देखील पावसाळा सुरु होऊनदेखील हे काम आजतागत सुरू झालेले नाही. एखादी गंभीर घटना घडल्यावरच सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

  योग्य वेळी दखल घेतली असती, तर वाहतूक बंद करण्याची वेळ बांधकाम खात्याला आली नसती, परंतु अजूनही वेळ गेलेली नसून तातडीने काम सुरु करावे, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

  विहार पुलाच्या संरक्षक भिंती व दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली असून, लवकरच कामास सुरुवात होणार आहे.

  – एस. आर. गोरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते