
कर्जबुडव्या उद्योगपती आणि फरारी आरोपी विजय मल्याकडे (Vijay Mallya) कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता. मात्र, कर्ज फेडण्याऐवजी देशातून पलायन करण्यापूर्वी त्याने परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सीबीआयने (CBI) मल्याविरोधात विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.
मुंबई : कर्जबुडव्या उद्योगपती आणि फरारी आरोपी विजय मल्याकडे (Vijay Mallya) कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता. मात्र, कर्ज फेडण्याऐवजी देशातून पलायन करण्यापूर्वी त्याने परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सीबीआयने (CBI) मल्याविरोधात विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.
किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मल्याकडे २००८ ते २०१७ या कालावधीत बँकांची परतफेड करण्याकरिता पुरेसा पैसा होता. मल्याने संपूर्ण युरोपमध्ये वैयक्तिक मालमत्ता खरेदी केली असून स्वित्झर्लंडमधील त्याच्या मुलांच्या ट्रस्टमध्ये पैसेही हस्तांतरित केल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
मल्यावर १७ बँकांचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. परंतु त्याच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स आर्थिक अडचणीत सापडली होती आणि बँकांना त्याच्याकडून पैसे वसूल करता येत नव्हते. मात्र त्याचवेळी मल्याने २०१५-१६ मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ३३० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने विविध देशांना पत्र पाठवून मल्याच्या परदेशीतील व्यवहारांची आणि मालमत्तेची तपशीलवार माहिती मागवली. त्यात मल्याने फ्रान्समध्ये ३५ दशलक्ष युरोमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे आणि गिझमो होल्डिंग्स या मालकीच्या एका कंपनीच्या खात्यातून आठ दशलक्ष युरो भरण्याची मागणी केल्याची माहिती मिळाल्याचा दावाही सीबीआयने केला.
मल्याने २०१६ मध्ये देशातून पलायन केले आता तो ब्रिटनमध्ये वास्तव्यास असून त्याच्यावर खटला चालवता यावा यासाठी त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीबीआयने यापूर्वीच्या आरोपपत्रात मल्यासह ११ जणांना आरोपी दाखवले होते. पुरवणी आरोपपत्रात आयडीबीआय बँकेचे माजी महाव्यवस्थापक बुद्धदेव दासगुप्ता यांनाही आरोपी केले असून कथितपणे आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आणि आयडीबीआय बँक अधिकारी आणि मल्यासह कट रचून ऑक्टोबर २००९ मध्ये १५० कोटी रुपयांचे अल्प-मुदतीचे कर्ज मंजूर करून ते वितरीत केले, असा आरोप सीबीआयने दासगुप्ता यांच्यावर केला आहे.