
छत्रपती संभाजीनगर : अपुऱ्या पावसामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट असून, खरिपाची पिके हातची गेली आहेत. संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील १६५५ शेतकऱ्यांनी गेल्या आठ महिन्यात आत्महत्या केल्या. आत्तापर्यंत केवळ ३८ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या धरणात ३८ टक्क्यांखाली तर छोट्या प्रकल्पामध्ये १८ ते २२ टक्के पाणी आहे.
विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
त्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. राज्य सरकारने कर्नाटकाप्रमाणे राज्यात दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (ता. २२) केली.
अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला
पत्रकार परिषदेत वडेट्टीवार पुढे म्हणाले, गतवर्षी अतिवृष्टीमुळे तर यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेची २०१७ मध्ये घोषणा करण्यात आली पण फक्त २५ टक्के लोकांना त्याचा लाभ मिळाला. अनेक शेतकऱ्यांकडे पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कर्जमुक्तीचे पत्र आहेत, पण त्यांचे कर्ज कागदोपत्री सुरूच आहे.
अतिवृष्टीत चार लाख ७३ हजार हेक्टर जमीन उद्ध्वस्त
त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जात आहे. २०२१-२२ मध्ये अतिवृष्टीत चार लाख ७३ हजार हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली. आमच्या सरकारने मदत जाहीर केली, पण नंतर सरकार बदलले व केवळ सव्वालाख शेतकऱ्यांना मदत मिळाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
आता ८० चोर दोन अलिबाबा
राज्यात पूर्वी एक अलिबाबा आणि ४० चोर होते, आता दोन अलिबाबा आणि ४० चोर असल्याचे टीकास्त्र वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर सोडले. जाती-पातीत भांडणे लावून तिजोरीची लूट करण्याचे एकमेव काम सध्या सुरू आहे. सत्ताधाऱ्यांची आपआपसात पटत नाही, कोण कोणाला लांडगे म्हणते तर कोणी कावळे म्हणत आहे. या प्राण्यांचा अपमान कशाला करता? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला.
भटके विमुक्तांसाठी उपोषणाचा इशारा
भटके विमुक्त कृती समितीच्या बैठकीत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. राजपूत समाज भामटा प्रमाणपत्र काढून घुसखोरी करत आहे. त्यामुळे खऱ्या समाजावर अन्याय होत असून, या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. रक्त नात्यासंबधी २०१७ मध्ये काढलेला जीआर रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांचा शासनाने विचार न केल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषण करू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.