
मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एल्विश यादवने एका रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एल्विश करतो रेव्ह पार्ट्यांचे आयोजन
युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एल्विश रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करीत असून तिथे येणाऱ्या लोकांना तो सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटक झाली आहे. तसेच, याप्रकरणी एल्विशला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्स शी संबंधित अनेक आरोप एलविश वर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे ? @mieknathshinde @rautsanjay61 @OfficeofUT @ShivsenaUBTComm pic.twitter.com/VQmSsT64xU
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 3, 2023
एल्विश मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आढळल्याने विरोधकांची टीका
दरम्यान, एल्विश यादवविरोधात गुन्हे दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. कारण, यंदाच्या गणेशोत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला वर्षा बंगल्यावर (मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान) येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर एल्विश मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेला. तिथे त्याने गणपतीची आरतीदेखील केली होती. त्याने मुख्यमंत्र्यांबरोबर फोटोही काढले होते. एकनाथ शिंदे आणि एल्विशचे फोटो शेअर करीत विरोधक एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट
“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. नशेबाज तरुणांना महाराष्ट्रातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावत आहेत का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
ड्रग्ज रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे एल्विशवर दाखल
एल्विश आणि एकनाथ शिंदेंचा गणेशोत्सवातला फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करीत सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्ज रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्जशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण, हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे?
वर्षा बंगल्यावर बोलवून त्याचं आदरातिथ्य केलं
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवसारख्या नशाबाजांना वर्षा बंगल्यावर बोलवून त्याचं आदरातिथ्य केलं होतं. शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला होता. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, ड्रग्जची विक्री करणारा, सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, त्याचं सेवन करणे आणि ते विकणे असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत.
एल्विश गारुड्यांकडून विष घ्यायचा?
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ गारुड्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ कोब्रा नाग आणि सापाचं विष जप्त केले आहे. या गारुड्यांनी सांगितलं की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे दाखल झाल्यानंतर एल्विशची प्रतिक्रिया
गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्विश यादवने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, “खरं तर मला गंभीर विषयांवर बोलायला आवडत नाही. परंतु, माझ्याविरोधात पूर्णपणे खोट्या बातम्या पसरल्या आहेत. त्यामुळे मला बोलावं लागतंय. माझा त्या गोष्टींशी कसलाच संबंध नाही. तुम्ही लोक रोज माझे व्लॉग्स बघता. मी रोज नवनव्या ठिकाणी असतो. विषारी सापांचे विष पुरवतो, असा माझ्यावर आरोप आहे. आता हेच काम उरलंय माझ्या आयुष्यात. सापांचं विष लोकांना विकू आणि त्याची नशा करू?