Villagers-Forest Department face to face from Tendupatta, tension at Jambhali Dodke, tight police security

आम्ही जांभळी दोडके येथे वनहक्क कायदा २००६ अंतर्गत सर्व प्रक्रिया राबवून या वर्षी तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहोत. ग्रामसभेमुळे तेंदूपत्त्याला ८५० रुपयांचा चांगला दर मिळत आहे. मात्र, वनविभागाने आमचे नाव शासकीय प्रक्रियेमध्ये लिलाव करून केवळ २५० रुपये दराने तेंदूपत्ता कंत्राटदाराला विक्री करीत आहेत. परिणामी, गावकऱ्यांचे नुकसान होत आहे.

    सडक अर्जुनी : तेंदूपत्ता तोडणी करून तो ग्रामसभेच्या निर्णयानुसार त्यांच्या फळीवर संकलित करणाऱ्या तालुक्यातील जांभळी दोडके येथील ग्रामसभेच्या फळीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.१४) जप्तीची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. याला वनहक्क समिती, गावकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे जांभळी येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

    जांभळी दोडके येथील ग्रामसभेने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अन्वये गठित गावाची ग्रामसभा व वनहक्कधारक यांनी २०१२ मध्ये गावाचा वनहक्क कायदा २००६ अंतर्गत सामूहिक वनहक्काचा दावा उपविभागीय कार्यालयात दाखल केला. पण, १० वर्षांचा कालावधी लोटूनही जिल्हाधिकारी कार्यालयाने याला मंजुरी दिली नाही. परिणामी, आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी यांना त्यांच्या वनावरील स्वामित्व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. वनहक्क कायद्याच्या सुधारित नियम कलम ५ मधील तरतुदीनुसार दाव्याची मान्यतेची व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज वननिवासी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना त्यांच्या वनहक्कापासून वंचित ठेवता येत नाही. मात्र, यानंतरही शनिवारी (ता.१४) वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा ताफा घेऊन जांभळी येथे ग्रामसभेच्या तेंदूपाने संकलन केंद्रावर कोणतीही पूर्वसूचना न देता तेंदूपाने जप्त करण्याचा प्रयत्न केला.
    या सर्व प्रकारामुळे गावातील शांतता भंग झाली असून ग्रामसभेच्या अधिकारांवर गदा आणल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. तर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांशी अभद्र व्यवहार केल्याचा आरोप केला. गावकऱ्यांना त्यांच्या वनहक्कापासून वंचित ठेवता येत नसून वनविभागाने कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामसभा जांभळी या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे जांभळी येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

    ग्रामसभेमुळे तेंदूपत्त्याचा ८५० रुपये दर

    आम्ही जांभळी दोडके येथे वनहक्क कायदा २००६ अंतर्गत सर्व प्रक्रिया राबवून या वर्षी तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहोत. ग्रामसभेमुळे तेंदूपत्त्याला ८५० रुपयांचा चांगला दर मिळत आहे. मात्र, वनविभागाने आमचे नाव शासकीय प्रक्रियेमध्ये लिलाव करून केवळ २५० रुपये दराने तेंदूपत्ता कंत्राटदाराला विक्री करीत आहेत. परिणामी, गावकऱ्यांचे नुकसान होत आहे. बोनससुद्धा मागील तीन-चार वर्षांपासून अद्यापही मिळालेला नाही. शनिवारी वनविभागामार्फत कोणतेही पत्र व पूर्वसूचना न देता पोलिस ताफा घेऊन फळीवर करण्याचा प्रयत्न केला.