
शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी दोघांना अटक (Dahisar Police) केली. या दोघांपैकी एक असलेल्या विनायक डायरे या तरुणाला कल्याण तिसगाव परिसरातून ताब्यात घेतलं आहे.
कल्याण: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे(Sheetal Mhatre) यांचा वादग्रस्त व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे (Viral Video) खळबळ उडाली होती. दरम्यान, या वादग्रस्त व्हिडिओवर शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी दोघांना अटक (Dahisar Police) केली. या दोघांपैकी एक असलेल्या विनायक डायरे या तरुणाला कल्याण तिसगाव परिसरातून ताब्यात घेतलं आहे.
विनायक डायरे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. विनायक डायरे याच्या घरी शिवसेनेचे तीन कार्यकर्ते आले. त्यांनी विनायक डायरे व त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप डायरे कुटुंबाने केला आहे. याबाबत डायरे कुटुंबाने आज कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी धमकी देणाऱ्यांची नावे सांगत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र नाव सांगून पण पोलीस अज्ञातांविरोधात तक्रार घेत असल्याचा आरोप डायरे कुटुंबांनी केलाय. या विरोधात मध्यरात्रीच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. घरात घुसून धमकावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
व्हिडिओ बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता. या प्रकरणी म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलिसांकडे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा व्हिडिओ कुणी बनवला आणि कुणी फोरवॉर्ड केला याचा तपास पोलिस करत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली होती. म्हात्रे म्हणाल्या, आमचं भावा-बहिणीचं नातं आहे. पुरुषी विचार कसा घाणेरडा असतो हे यावरून सिद्ध झाले आहे. जेव्हा एखादी स्त्री राजकारणात चांगले काम करत असते, तेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. मी माझ्या आत्मसन्मानासाठी सर्व काही करण्यास तयार आहे. आज मी सुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहिण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.