द्राक्षबागांना पुन्हा धोका; वातावरण बदलामुळे तासगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल

तासगाव शहरासह तालुक्याच्या सर्व भागात दोन ते चार दिवस ढगाळ हवामान व पाऊस आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांवर डाऊनी रोगाचा हल्ला होण्याची शक्यता आहे.

    तासगाव : तासगाव शहरासह तालुक्याच्या सर्व भागात दोन ते चार दिवस ढगाळ हवामान व पाऊस आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांवर डाऊनी रोगाचा हल्ला होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाला आहे. हवामान बिघडल्याने व अवकाळी पावसाच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदार गारठले आहेत. या परिस्थित पाऊस झाला तर फुलोऱ्यात असणाऱ्या बागांची घडकुज व मनिगळ होणार आहे.

    द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश विदेशात ओळख आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर तालुक्यात द्राक्ष शेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश विदेशात पाठवला जातो. गेली दोन वर्षांपूर्वी निलोफर चक्री वादळ व अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले.

    हवामानामुळे डाऊनी रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांवर फैलाव झाला होता. घडाचे मणी गळून गेले तर डाऊनी रोगाच्या फैलावाने शेकडो एकर क्षेत्र या रोगास बळी पडले होते. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

    डाऊनी राेखण्यासाठी औषध फवारणी

    सध्या आगाप द्राक्षाची पोंगा विरळनी फुलोरा ब डिपिंगची अवस्था आहे. या दरम्यान डाऊनीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. त्यातच खराब हवामान व पावसाच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदार चांगलाच गारठला आहे. डाऊनी रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्याची औषधे शेतकरी खरेदी करताना दिसत आहे. या बातावरणाने डाऊनी रोगाची वाढ पानांवर होत आहे.