
विशाख कृष्णास्वामी याने आज सकाळी ८ वाजता विश्वविक्रम केला. त्याचे अभिनंदन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे उपस्थित राहून त्यांनी विशाखचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
कल्याण : गेल्या ६१ दिवसांपासून दररोज ४५ किलोमीटर नियमित पणे धावून विश्वविक्रम करून डोंबिवलीचे नाव जगभरात पोहोचविणारा डोंबिवलीकर उत्साही युवक विशाख कृष्णास्वामी याने आज सकाळी ८ वाजता विश्वविक्रम केला. त्याचे अभिनंदन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे उपस्थित राहून त्यांनी विशाखचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दोन मिनिटे सायरन वाजवून विशाखच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला अभिवादन दिले. ढोल ताशा बँड आणि टाळ्यांच्या आवाजात विशाख विशाख असा जल्लोष सर्व डोंबिवलीकर करत होते. याप्रसंगी विशाख कृष्णास्वामीची आई देखील स्टेजवर उपस्थित होती. या कौतुक सोहळ्यात विशाखने यापुढे देखील नियमितपणे ४५ किलोमीटर अंतर शंभर दिवसांपर्यंत धावून आणखीनही काही जागतिक विश्वविक्रम पूर्ण करण्याचा मनोदय उपस्थितांसमोर व्यक्त केला.
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने विशाखच्या कौतुक, अभिनंदनचा सोहळा पार पाडण्यासाठी आकर्षक स्टेजची तसेच रंगीबेरंगी फुग्यांच्या अंतिम रेषा गेटची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास डोंबिवलीतील क्रीडा क्षेत्रामधील लहान मुलांपासून तरुणांपर्यंत शेकडो लोक व क्रीडा क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होऊन विशाखचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या.
विशेषतः रनर्स क्लॅन या संस्थेचे सदस्य, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, संत सावळाराम क्रीडा संकुलातील सर्व सदस्य, कल्याण डोंबिवली स्पोर्ट टीचर युनियनचे पेंढारकर कॉलेजचे नाईक, क्रीडा संवर्धिनी, केरळा समाजमचे माजी अध्यक्ष प्रदीप नायर व सदस्य, सेंट जोसेफ शाळेचे बँड पथक, श्रीमंत ढोल ताशा पथक, क्रीडा संकुलात येणाऱ्या पोलीस भरती प्रशिक्षण घेणारे शेख व त्यांची सर्व प्रशिक्षणार्थी असे शेकडो डोंबिवलीकर या अभिमान सोहळ्यात उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केले असून या प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे, माजी सभापती प्रदीप हाटे तसेच माजी नगरसेवक प्रकाश माने, बाळासाहेबांची शिवसेना युवा सेनेचे डोंबिवली शहर प्रमुख सागर जेधे, शहर पदाधिकारी दीपक भोसले, प्रथमेश खरात, कौस्तुभ फडके आदी मान्यवर उपस्थित होते.