विशाल पाटलांचे बंड कायम; सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात

राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विशाल पाटील यांचा बंडाचा निर्णय अखेर कायम राहिला. अर्ज माघारीसाठी प्रदेशच्या नेत्यांकडून अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले, मात्र ते अपक्ष लढण्यावर ठाम राहिले.

  सांगली : राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विशाल पाटील यांचा बंडाचा निर्णय अखेर कायम राहिला. अर्ज माघारीसाठी प्रदेशच्या नेत्यांकडून अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले, मात्र ते अपक्ष लढण्यावर ठाम राहिले.

  विशाल यांच्या बंडामुळे भाजपचे खासदार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यात सांगलीची तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी पाच उमेदवारांनी माघार घेतली.

  निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 20 उमेदवार राहिले असून त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. स्वाभिमानी पक्षाकडून महेश खराडे यांच्यासह अन्य पक्ष व अपक्षांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारपासून (दि.23) प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.

  लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज व छाननीनंतर एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीस उमेदवारांंपैकी पाच जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित 20 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.

  काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या माघारीसाठी वरिष्ठ पातळीवरुन शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. पाटील यांना विधानपरिषद अथवा राज्यसभा देण्याची ऑफर देत मनधरणीचा प्रयत्न केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांकडून विशाल यांच्याशी संपर्क करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. परंतु उमेदवारी मागे न घेण्यासाठी विशाल यांच्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा दबाव राहिला. त्यामुळे पाटील यांचा अपक्ष अर्ज राहिला. त्यांची उमेदवारी राहिल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याने स्पष्ट झाले.

  स्वाभिमानीच्या खराडे यांच्या माघारीचे प्रयत्न असफल

  स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार महेश खराडे यांच्या माघारीसाठी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह समर्थकांनी शेवटच्या क्षणापर्यंत केले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्यात आला, मात्र तेथेही यश आले नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

  पाच जणांची माघार

  निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा डमी अर्ज भरलेले माजी मंत्री प्रतिक प्रकाश बापू पाटील यांच्यासह पाच जणांनी माघार घेतली. याशिवाय दिगंबर गणपत जाधव, रेणुका प्रकाश शेंडगे, सुरेश तुकाराम टेंगले आणि बापू तानाजी सुर्यवंशी या अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज काढून घेतला.

  उमेदवारांनी खर्चाचा तपशिल द्यावा

  लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आचारसंहितेबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी त्याबाबतची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. उमेदवारांना खर्चाबाबतचा तपशिल वेळोवेळी सादर करावा. तसेच गुन्हे दाखल असल्यास त्याची तीन वेळा वर्तमान पत्रातून जाहीरात प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दयानिधी यांनी सांगितले.