विशाल पाटलांची लढेंगे-जितेंगे भूमिका, काँग्रेस कार्यकर्त्यांना लिहिले पत्र; लोकसभा लढण्यावर ठाम

जागावाटपाचा घोळ सुरू असताना आता विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा लढणार आणि जिंकणार सुद्धा अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्याना पत्र लिहीत जाहीर केली आहे.

  सांगली : सांगली लोकसभा निवडणूक महायुती विरुद्ध महविकास आघाडी अशी चर्चेत राहण्याऐवजी ती महविकास आघाडीतील बिघाडीवरून जास्त चर्चेत राहू लागली आहे. जागावाटपाचा घोळ सुरू असताना आता विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा लढणार आणि जिंकणार सुद्धा अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्याना पत्र लिहीत जाहीर केली आहे.

  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केल्यावर विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होती. जिल्ह्यात काँग्रेसचे असणारे दोन आमदार आणि इतर सत्ता अशी गणिते मांडली जात होती. परंतु आता खुद्द विशाल पाटील यांनीच थेट कार्यकर्त्याना पत्र लिहून ‘लढेंगे- जितेंगे’ अशी भुमीका घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, तर शिवसेनेच्या गोठात गोंधळ निर्माण झाला आहे.

  विशाल पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.

  स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम, स्व. गुलाबराव पाटील, स्व. प्रकाश पाटील (बापू), स्व. मदन पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.

  सांगली काँग्रेसचीच राहणार

  आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू, असे पत्रात पाटील यांनी म्हटले आहे.

  आम्हाला कोणीही इशारा देऊ नये

  सांगली जिल्ह्यातील लोकसभेची जागा ही परंपरेने काँग्रेस पक्षाची आहे, अशी लोकभावना आहे. त्या ठिकाणी काँग्रेसचे मजबूत संघटन आहे. ती जागा लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, सांगली जिल्ह्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास माहिती असणारे कोणीही सांगेल की, हा जिल्हा काँग्रेसच्या विचारधारेचा जिल्हा आहे. आम्हाला कोणीही इशारा देऊ नये, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासूनचा हा पक्ष आहे. सांगली बाबत बाहेरच्यांनी न बोललेलं चांगलं, असा सल्ला माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी खासदार संजय राऊत यांना दिला.