सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदम आग्रही; काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल यांची घेतली भेट

सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच चालू आहे. या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने बुधवारी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

    सांगली : सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच चालू आहे. या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने बुधवारी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

    यामध्ये 17 उमेदवारांची नावे असून, यात सांगलीच्या जागेचाही समावेश आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. परंतु, त्यास काँग्रेसने विरोध केला आहे.

    पलूस-कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजीत कदम तसेच विशाल पाटील यांनी दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत कदम आणि पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत, अशी गळ घातली. या भेटीनंतर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

    यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, आम्ही पक्षश्रेष्ठींना ठामपणे सांगितले आहे की, ही जागा आपल्याला मिळायला हवी. मी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे की, कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची लोकसभा दिली जाईल असे कधीच ठरले नव्हते. कारण ते आम्हाला मान्य नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की, काँग्रेस पक्ष निश्चितपणे सांगलीच्या जागेबाबत पुन्हा एकदा सर्व नेत्यांशी बोलेल.