वेतन पथक अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची चौकशी होणारचं; सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिले स्पष्टीकरण

प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन वेतन पथक अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची चौकशी पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले.

    सोलापूर : प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन वेतन पथक अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची चौकशी पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले.

    शिक्षक भारती संघटनेने तत्कालीन वेतन पथक अधीक्षक विठ्ठल ढेपे यांच्या विरोधात तक्रार केली होती. वेतन पथक अधीक्षक मिश्रा रजेवर गेल्यावर प्रभारी पदभार आल्यानंतर ढेपे यांनी कोट्यावधीची बिले कमिशनवर काढली असा त्यांचा आरोप होता. याबाबत शिक्षक भरती संघटनेने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले होते. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी ढेपे यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर शिक्षक भारती संघटनेने आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर सीईओ आव्हाळे यांनी ढेपे यांची चौकशी करण्यासाठी मुख्य व वित्त लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांची चौकशी समिती नेमली होती.

    पण नंतर शिक्षक भारती संघटनेने ढेपे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याचे आश्वासन दिल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे ढेपे यांची चौकशी बंद झाली अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. याबाबत विचारले असता सीईओ आव्हाळे म्हणाल्या, प्रशासनाने ढेपे यांच्याविरुद्ध चौकशी प्रस्तावित केली आहे. मुख्य व वित्त लेखाधिकारी वाकडे या त्यांच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करतील. तो अहवाल शिक्षण आयुक्तांकडे पाठविला जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने एकदा सुरू केलेली चौकशी कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.

    ढेपे यांचे आश्वासन कसे?

    शिक्षक भारती संघटनेने नव्याने अनुदान आल्यानंतर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे ढेपे यांनी आश्वासन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. ढेपे आता त्या पदावर नाहीत व पुन्हा येण्याची शक्यता नाही. आता मग ते कसे शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्षक भारती संघटनेने प्रश्न मिटला असल्याचे पत्र दिले असले तरी ढेपे यांच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी होणारच असल्याचे सीईओ आव्हाळे यांनी स्पष्ट केल्याने ढेपे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत ढेपे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसीव केला नाही.