मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोनचं नेटवर्क डाऊन, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा खंडित, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

मुंबईत व्होडाफोनची कॉलिंग आणि इंटरनेट सेवा तासाभरापासून खंडित आहे. लवकरच आम्ही सेवा पूर्ववत करु, असं व्होडाफोनकडून सांगण्यात आलं आहे.

    मुंबई: व्होडाफोनसंदर्भातली (Vodafone) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोनचं नेटवर्क डाऊन (Vodafone Network Down In Mumbai) झालं आहे. मुंबईत व्होडाफोनची कॉलिंग आणि इंटरनेट सेवा तासाभरापासून खंडित आहे. लवकरच आम्ही सेवा पूर्ववत करु, असं व्होडाफोनकडून सांगण्यात आलं आहे. (Vodafone Down) ट्विटरवर(Twitter) लोकांनी याविषयी तक्रार केली आहे. व्होडाफोनची सेवा परत कधी सुरु होणार ? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.

    देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अशी व्होडाफोन- आयडिया (Vodafone-Idea) ची ओळख आहे. सगळ्यांना माहिती आहे की कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला होता. कंपनीने खरंतर आपल्या ग्राहकांना संदेश पाठवला होता की, त्यांची प्रीपेड सेवा 13 तासांसाठी बंद राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून 13 तासांसाठी ही सेवा बंद करण्यात आली होती. या दरम्यान व्होडाफोन- आयडिया ग्राहकांना फोन रिचार्ज करता आलं नाही.

    व्होडाफोन आयडिया मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. परवाना शुल्कही भरण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. परवाना शुल्क सरकारला भरता न आल्याने कंपनीला परवाना रद्द करण्याची अडचण निर्माण झाली आहे. कंपनीला परवाना शुल्क म्हणून 780 कोटी रुपये भरायचे होते पण व्होडाफोन-आयडिया केवळ 78 कोटी रुपये देऊ शकली आहे. अडचणींचा सामना करत असलेल्या वोडाफोन-आयडियाने आतापर्यंत 5G सेवाही सुरू केलेली नाही.