महाड तालुक्यात मतदानासाठी जाताना मतदाराचा मृत्यू

महाड तालुक्यात एकाचा मृत्यू तर एका पत्रकाराला आली आकडी, ग्रामीण उपचार रुग्णालयात सुरु

    महाड : राज्यामध्ये दिवसेंदिवस तापमान वाढत चाललं आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या तयारी ठिकठिकाणी सुरु आहे. आज लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे. अनेक ठिकाणी मतदारांना रांगेत उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे. याचदरम्यान मतदान करण्यासाठी जात असताना चक्कर आल्याने मतदाराचा मृत्यू होण्याची घटना महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड येथे घडली. प्रकाश केशव चिनकाटे (वय ६५) असे मरण पावलेल्या मतदाराचे नाव आहे. आज सकाळी ९ वाजता ते मतदानासाठी बाहेर पडले. मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या अंतरावर असतानाच ते चक्कर येवून कोसळले. त्यांना घरी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

    पत्रकाराला आली आकडी; ग्रामीण उपचार रुग्णालयात सुरु

    पोलादपूर येथील दैनिक सकाळचे पत्रकार देवेंद्र दरेकर यांना मतदान केंद्राकडे जात असताना आकडी आल्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवेंद्र दरेकर हे आपल्या नातेवाईकांना घेऊन एका वाहनाने मतदान केंद्राकडे जात होते. वाहन चालवित असतानाच त्यांना आकडी आली. प्रसंगावधान राखून त्यांनी कार थांबवली. त्यांना तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब वाढल्याने त्यांना आकडी आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.