महाराष्ट्रातील 11 जागांसह देशात 93 जागांवर आज मतदान; बारामती, सोलापूर, सांगलीकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) तिसऱ्या टप्प्यातील 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद होईल.

  मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) तिसऱ्या टप्प्यातील 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने हा टप्पा सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे.

  मतदान होत असलेल्या मतदारसंघात बहुतांशी दुरंगी लढत असून, अनेक ठिकाणी उमेदवारांपेक्षा स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे.

  बारामतीत सर्वांत चर्चेची लढत

  तिसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची लढत बारामतीची ठरली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयीचा सामना रंगणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देशभराचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार या काका-पुतण्यांच्या राजकारणाचा कस पाहणारी ही निवडणूक होणार आहे.

  राणे-तटकरेंचा कस

  रत्नागिरीत नारायण राणे व रायगडात अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कस या निवडणुकीत लागला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना अजित पवार, नारायण राणे आणि सुनील तटकरे हे आपापल्या मतदारसंघात अडकून पडले आहेत. राणे, तटकरेच नव्हे तर अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक ठरणार आहे. तर सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  राजू शेट्टींसाठी अस्तित्त्वाची लढाई

  हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेट्टी यांच्यासाठी यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.