एकला चलो की मित्रांना टाळी देणार? काय आहे मनसेचा गेम प्लॅन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी 'वर्षा' बंगल्यावर जाऊन गणपती दर्शन घेतले.

    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मनसेची साथ घ्यावी लागणार आहे. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी मनसे आमदाराने शिंदे यांच्याबाजूने मतदान केले होते. यामुळे शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यामधील जवळीक वाढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर हजेरी लावली आहे. पूर्वीचे बलशाली असे केंद्रस्थान असणारे ‘मातोश्री’चे महत्व कमी करून त्याची जागा शिवतिर्थाने घेतली आहे हे दाखविण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे.

    आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट राज ठाकरे यांच्या मनसेसोबत हातमिळवणी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, राज ठाकरे यांनी अदयाप आपली भूमिका जाहीर केली नसली तरी ‘एकला चलो’ या भूमिकेवर ठाम राहून आधीच्या निवडणुकीप्रमाणेच राज ठाकरे व्यूहरचना आखण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

    २०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजप युती तुटली. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यावेळी भाजप उमेदवार असलेल्या मतदारसंघात आपले उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. तर, शिवसेना उमेदवाराविरोधात आपले उमेदवार उभे करून भाजपच्या सहाय्याने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केले होते. २०१४ च्या निवडणुकीत खेळलेली हीच खेळी आगामी महापालिका निवडणुकीत मनसेकडून खेळण्यात येणार आहे. यामुळे ‘एकला चलो’ ही आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवत मित्रपक्षांना सहकार्य करण्याची व्यूहरचना मनसेकडून आखण्यात येत असल्याचे या सूत्रांनी सांगितले.