दिवाळीमध्ये माणुसकीच्या भिंती गायब ; समाजातील सुसंवादा अभावी पडतायेत माणसात दरी

दिवसेंदिवस सण व उत्सवांना आलेल्या भपक्यामुळे सणांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दिवाळी देखील याला अपवाद राहिलेली नाही. या सणाला फक्त अवास्तव खर्च केला म्हणजे दिवाळी धुमधडाक्यात साजरी करणे, ही मानसिकता काही ठराविक वर्गात वाढत चालली आहे. तर दुसरीकडे पैशाअभावी गोरगरीब लोक दिवाळी साजरी करू शकत नाहीत, ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. यामुळे सामाजिक विषमतेची दरी कशी भरून काढायची हा प्रश्न सतावत आहे.

  विजय मोरे,  वरवंड :  दिवसेंदिवस सण व उत्सवांना आलेल्या भपक्यामुळे सणांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दिवाळी देखील याला अपवाद राहिलेली नाही. या सणाला फक्त अवास्तव खर्च केला म्हणजे दिवाळी धुमधडाक्यात साजरी करणे, ही मानसिकता काही ठराविक वर्गात वाढत चालली आहे. तर दुसरीकडे पैशाअभावी गोरगरीब लोक दिवाळी साजरी करू शकत नाहीत, ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. यामुळे सामाजिक विषमतेची दरी कशी भरून काढायची हा प्रश्न सतावत आहे.

  समाजातील ही वास्तवता बदलण्यासाठी व समाजातील गरिबांच्या अंधारमय जीवनात प्रकाशाचा दिवा लावण्यासाठी सामाजिक जाणिव ठेऊन पुढे येण्याची गरज आहे. यामुळे सणाच्या निमित्ताने आदरभाव जपण्यास मदत होऊ शकते. मात्र दिवसेंदिवस प्रत्येकजण आपला आर्थिकस्तर उंचावण्याकडे लक्ष देत आहे. मात्र ग्रामिण भागातील पाहुण्यांना समजून घेण्याची मानसिकता आजही लोप पावली असल्याचे चित्र आहे. तर तुसडेपणाच्या वागणूकीमुळे गावाकडील लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

  दिवसेंदिवस एकत्र कुटुंब पद्धतीचा झालेला ऱ्हास या काही कारणांमुळे सणासाठी येणारे पाहुणे दिसणे आता दुर्मीळ झाले आहे. तसेच वाढती महागाई व आर्थिकदृष्ट्या परस्थिती चांगली असतानाही, चाकोरेबद्ध जीवन शैलीमुळे प्रत्येकावरच मर्यादा आल्या आहेत. तर कमी श्रमात जास्त आलेला हा पैसा, फ्लॅट संस्कृती, तुसडेपणाची भावना यामळे माणुसकीच्या भिंती गायब झाल्याची भावना मन सुन्न करून टाकत आहे.

  या सर्व परस्थितीमुळे नात्यातील अंतर कमी होत चालले आहे. हे समाजातील कटू वास्तव नाकारता येत नाही. मात्र सण,उत्सव यामध्ये लोकांचा सहभाग कमी होत आहे. यापूर्वी दिवाळी सणाच्या काळात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीच्या तसेच शेजारच्या व्यक्तींना दिवाळी फराळासाठी आवर्जून बोलावले जात असे. आजच्या बदलत्या काळात एकमेकांना सणाला बोलावणे का बंद झाले आहे?,हा संशोधनाचा विषय बनला आहे.

  -माणुसकी जीवंत असणे गरजेचे
  दिवसेंदिवस शेजारधर्म मागे पडून त्याची जागा तुसडेपणाने घेतल्याने संवाद हरवल्याबाबत प्रत्येक व्यक्ती नाराजी व्यक्त करत आहे. यामुळे एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी व स्नेहबंध व माणुसकी आपोआप कमी झाला आहे. घरगुती दिवाळी साजरी करताना मर्यादित दिवाळीचा आनंद घेण्यात गुंग होऊन त्यातच समाधान मानावे लागत आहे. मैत्री आणि नात्यांमध्ये घट्टपणा निर्माण करण्यासाठी हेच सण आपली नाती घट्ट करत असतात. मात्र दिवाळीचा भपकेपणा दाखविण्यासाठी नको तेथे माणुसकी जीवंत असणे गरजेचे आहे.

  -फटाक्यांवर हजारो रुपये खर्च
  आजही काही प्रमाणात असलेला अशिक्षित समाज, गरिबी, अंधश्रद्धा, खुळचट विचार या सर्व कारणांमुळे गरिबीचे प्रमाण दिसून येत आहे. यामुळे या उत्सवात काहीच्या घरी दिवाळी साजरी होत नाही. मात्र फटाक्यांवर हजारो रुपये खर्च करून क्षणात फटाक्यांच्या रूपाने पैशाचा धूर निघला जातो. यासाठी मानसिक दृष्टीने सक्षम असलेल्या नागरिकांनी सामाजिक भावनेतून पुढे येणे गरजेचे आहे. गरिबी हा दुवा पैशाने हिरावला आहे. यामुळे माणसातील माणुसकी कमी झाले आहे.

  दिवसेंदिवस शेजारधर्म मागे पडून त्याची जागा तुसडेपणाने घेतल्याने संवाद हरवल्याबाबत प्रत्येक व्यक्ती नाराजी व्यक्त करत आहे. यामुळे एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी व स्नेहबंध व माणुसकी आपोआप कमी झाली आहे. घरगुती दिवाळी साजरी करताना मर्यादित दिवाळीचा आनंद घेण्यात गुंग होऊन त्यातच समाधान मानावे लागत आहे. मैत्री आणि नात्यांमध्ये घट्टपणा निर्माण करण्यासाठी हेच सण आपली नाती घट्ट करत असतात. यासाठी माणुसकी, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा जपण्याबरोबर वृद्धिंगत करणे गरजेचे बनले आहे.