पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातींवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीवर भाजपने आक्षेप घेतला आहे.

    सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट अशी दोन गटांमध्ये शिवसेनेची विभागणी झाली. या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकारणाला एक वेगळेच वळण लागले. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातींवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh ) यांनी उपस्थित केला आहे.

    भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, शिवसेना ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराविरोधात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमधला कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये काम केले असून तो महिलांचे शोषण करतो. त्यामुळे अशा कलाकारांना घेऊन महिला अत्याचारावर जाहिरात कशी तयार केली? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

    दरम्यान पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, या जाहिराती मधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे. ठाकरे गटाने केलेल्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा समावेश आहे. आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला आहे. त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. एक पॉर्न स्टार ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये झळकत आहे. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाले नाही का? जाहिरात तयार करणारी कंपनी आणि ठाकरे गटाचा काही संबधं आहे का? असेल तर याचा तपास करायला हवा, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.