आता ओबीसीही मुंबईत धडकणार; राज्य सरकारला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या 26 तारखेपासून मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहेत. यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील मुंबईमध्ये येण्याचा इशारा दिला आहे.

    मुंबई : राज्यामध्ये आरक्षणावरुन (reservation) राज्यामध्ये वादंग निर्माण झाले आहे. मराठा समाज देखील सरसकट मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आग्रही आहे तर ओबीसी समाज (OBC reservation) यासाठी तीव्र विरोध दर्शवत आहेत.  मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे येत्या 26 तारखेपासून मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहेत. यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने (National OBC Federation)  देखील मुंबईमध्ये येण्याचा इशारा दिला आहे.

    राज्य सरकार 54 लाख नोंदी सापडल्य़ाचा दावा करत आहेत. परंतु यामध्ये किती लोकांकडे आधीपासून कुणबी प्रमाणपत्र आहे तर किती जणांच्या नवीन नोंदी सापडल्याबाबत याबाबत कोणतीही माहिती समोर आणलेली नाही. याचा निषेध राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. नागपूर जिल्ह्यात 2 लाख 35 तर मराठवाड्यात केवळ 28 हजार नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये बहुतांश लोकांकडे आधीपासून कुणबी जातीचे प्रमाणपत्र आहे. जर का नवीन नोंदी 1-2 टक्के असतील तर नवीन नोंदी कोणत्या आहेत त्याचा आकडा सरकारने जाहीर करायला हवा. सरकार 54 लाख नवीन नोंदी असल्याचे सांगून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे.

    “सरकारने 54 लाख नोंदीचे सर्वेक्षण करून कोणाकडे आधीपासून प्रमाणपत्र आहे आणि नवीन नोंदी किती याची आकडेवारी जाहीर करावी, तसेच ५ मे, २०२१ च्या निकालातून मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही मनोज जरांगे ५४ लाख कुणबी नोंदी भेटल्या असे म्हणत आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर आणि मुंबईत धडकेल,” असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला.