
जिल्ह्यातील प्रसिद्ध मूर्ती कला केंद्र असलेल्या सावरगाव बर्डे येथे मोठ्या आकाराच्या व घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या बुकिंग करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.
वाशीम : महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गणेश भक्तांची आणि मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. कोरीव आणि रेखीव गणेशमूर्तींमुळे वाशीम जिल्ह्यातील सावरगाव बरडे हे गाव मूर्तीकरांचे गाव म्हणून प्रसिध्द असून आता या गावाची ओळख ‘देव घडविणारे गाव’ म्हणून होत आहे. येथील गणेश मूर्त्यांना राज्यभरातून मागणी असते. यावर्षी राज्य शासनाने सार्वजनिक गणेश उत्सवावरील अटी शिथिल केल्यामुळे मूर्तिकार तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील वर्षी राज्य शासनाने गणेश मूर्ती वरील सर्व निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी, जिल्ह्यातील प्रसिद्ध मूर्ती कला केंद्र असलेल्या सावरगाव बर्डे येथे मोठ्या आकाराच्या व घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या बुकिंग करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.
सार्वजनिक गणेश मंडळातर्फे मोठ्या आकाराच्या आणि विविध रूपातील गणेश मुर्त्यांची वाढती मागणी लक्षात घेता या वर्षी मोठया आकाराच्या व विविध रूपातील मूर्त्या जास्त प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे घरी स्थापन करण्यासाठी लहान मूर्त्याची देखील मागणी जास्त प्रमाणात आहे. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस व कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किमती जरी वाढल्या असल्या तरी गणेश भक्त मागील वर्षापेक्षा यावर्षी मोठा उत्साहात दिसून येत असल्याचे मूर्तिकार यांनी सांगितले असून मूर्त्या बनिवन्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.