करायची होती भाजी मंडई अन् झाला तळीरामांचा अड्डा; म्हसवड शहरातील प्रकार

म्हसवड शहरात पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या भाजी मंडईच्या इमारतीचा वापर होत नसल्याने सध्या या इमारतीवर शहरातील भटक्या कुत्र्यांनी, तळीरामांनी व मनोरुग्णांनी तर दुपारच्या सत्रात जुगार खेळणाऱ्यांनी कब्जा केला.

    म्हसवड : म्हसवड शहरात (Mhaswad City) पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या भाजी मंडईच्या इमारतीचा वापर होत नसल्याने सध्या या इमारतीवर शहरातील भटक्या कुत्र्यांनी, तळीरामांनी व मनोरुग्णांनी तर दुपारच्या सत्रात जुगार खेळणाऱ्यांनी कब्जा केला. याच इमारतीमध्ये अनैतिक प्रकार सुरु असल्याचे दिसून येते. तर अनेक म्हसवडकर सध्या याच इमारतीचा वापर स्वच्छतागृह म्हणून करु लागले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही इमारत स्वच्छतागृह झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.

    म्हसवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व शहराचा नावलौकीक वाढावा याबरोबरच नागरिकांना सर्वसुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या सत्तेत म्हसवड पालिकेच्या इमारतीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात अद्यावत अशी भाजी मंडईची दुमजली इमारत उभी केली. त्यामध्ये जवळपास ४० लहान लहान गाळे उभारण्याचे नियोजन केले आहे. ते गाळे शहरातीलच सर्वसामान्य शेतकर्यांना भाजी विक्रीसाठी व सामान्य व्यापार्यांना दुकाने थाटण्यासाठी अल्पदरात देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत पूर्ण झाल्यावर याठिकाणी एकतर दुकानगाळा घेण्याची तयारी शहरातील सामान्य भाजीविक्रेत्यांनी व दुकानदारांनी केली होती.

    त्यानुसार या इमारतीचे काम सुरु होऊन जवळपास पूर्णही झाले होते. तोपर्यंत आमदार गोरेंची पालिकेतील सत्ता गेली अन् पालिकेच्या सत्तेत परिवर्तन झाले. नवीन सत्ताधारी या इमारतीचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करतील अन् लवकरच शहराच्या वैभवात भर घालणारी एक अद्यावत वास्तू सामान्य वर्गासाठी खुली होईल, या आशेवर म्हसवडकर बसले होते. मात्र, नवीन सत्ताधारी आणि संबधित ठेकेदार यांचे काही जुळेना. त्यामुळे इमारत पूर्ण होईना. अखेर संबधित ठेकेदाराने काम सोडल्याची चर्चा सुरु झाली.