बोंडारवाडीचे पाणी शेतीबरोबर पिण्यासाठी मिळणार : डॉ. भारत पाटणकर

शेतीच्या व पिण्याच्या होणाऱ्या एक टीएमसी बोंडारवाडी धरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतिम मंजूरी दिली असून, लवकरच धरणाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील राहू, मात्र धरणाला अंतिम मंजूरी मिळाली म्हणून ५४ गावंचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आता शांत झोपू नका.

    मेढा : शेतीच्या व पिण्याच्या होणाऱ्या एक टीएमसी बोंडारवाडी धरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतिम मंजूरी दिली असून, लवकरच धरणाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील राहू, मात्र धरणाला अंतिम मंजूरी मिळाली म्हणून ५४ गावंचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आता शांत झोपू नका. जोपर्यंत पाणी शेतात आणि घरातल्या हंड्यामध्ये येत नाही, तोपर्यंत सर्वजण संघटित आणि सक्रीय राहा, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर (Dr. Bharat Patankar) यांनी केले.

    मेढा येथील विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोंडारवाडी धरण कृती समितीचे प्रमुख विजय मोकाशी, धरणग्रस्त संघटनेचे नेते राजेंद्र जाधव, आदिनाथ ओंबळे, विलासबाबा जवळ, उषा उंबरकर आदी उपस्थित होते.

    यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, बोंडारवाडी धरण कृती समितीचे नेतृत्व श्रमिक मुक्ती दल करत असून, श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या पत्रामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर ही बैठक झाली. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, तालुक्याचे सुपूत्र आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर, कृती समितीचे विजयराव मोकाशी, संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

    या बैठकीत गेले पंधरा वर्ष गाजत असलेल्या बोंडारवाडी धरणाला तत्त्वत: नव्हे तर अंतिम कायमस्वरूपी मान्यता मिळाली असून, लवकरच यावर आर्थिक निधीची तरतूद होणार आहे. येत्या दीड महिन्यामध्ये या धरणाचे काम तातडीने सुरू होण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील राहू. बोंडारवाडी धरणामुळे या 54 गावातील विस्थापित झालेला शेतकरी कष्टकरी पुन्हा एकदा आपल्या गावामध्ये शेती करेल.

    गावातील प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळेल आणि खऱ्या अर्थानं ही 54 गावे सुजलाम् सुफलाम् होतील आणि बोंडारवाडी धरणाचा हा नवीन पॅटर्न महाराष्ट्राला एक आदर्शवत असा वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.