महाराष्ट्राला पाणी पुरवणाऱ्या कोयना जलाशयाबाबत मोठी बातमी; पाणीसाठा…

दुष्काळाची झळ जशी दुष्काळग्रस्त भागात जाणवते. तशीच ज्या भागात धरण आहे. त्याठिकाणी आता जाणवू लागली आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस जावळी तालुक्यातील व महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी विभागांमध्ये पडतो.

    पाचगणी / इम्तियाज मुजावर : दुष्काळाची झळ जशी दुष्काळग्रस्त भागात जाणवते. तशीच ज्या भागात धरण आहे. त्याठिकाणी आता जाणवू लागली आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस जावळी तालुक्यातील व महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी विभागांमध्ये पडतो. मात्र, आता महाराष्ट्राला पाणी पुरवणारे कोयना जलाशय आटले आहे. याचा मोठा फटका तापोळा बामणोली पर्यटनाला बसला आहे.

    चेरापुंजीनंतर या विभागात विक्रमी पावसाचा रेकॉर्ड आहे. अतिपावसाच्या या विभागाला अशा पातळीवर दुष्काळाच्या झळा भोगाव्या लागतील, असा विचार स्वप्नात देखील या विभागातल्या जनतेने केला नसेल. मात्र, गेल्या शंभर वर्षात तिसऱ्या वेळेस या विभागाला अशा पद्धतीच्या दुष्काळाच्या झळा भोगाव्या लागल्या आहेत. जून महिना संपत आला तरीही अद्याप या विभागाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पूर्वी 6 जूनलाच पहिल्याच पावसात हा कोयना जलाशय पाण्याने तुडूंब भरून जायचा. मात्र, जून महिना संपत आला तरी अद्यापही या कोयना जलाशयाच्या जमिनीवर पडलेल्या भेगांना पाहिल्यानंतर हा पावसाचा भाग की राजस्थानचा परिसर असा प्रश्न निर्माण होतो.

    मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरनंतर पर्यटकांची पावले वळतात. ती हिरवागार निसर्ग तसेच कोयना जलाशतील बोटिंगची मजा लुटण्यासाठी बामणोली-तापोळ्याकडे. मात्र, अलीकडच्या वर्षात हे चित्र बदललंय कधीही दुष्काळ न पाहिलेल्या भागाला आता दुष्काळाचा मोठा सामना करावा लागतो.

    कोयना धरणात पाणी पातळी खालावल्यामुळे बामणोली-तापोळा परिसराला याचा मोठा फटका बसला आहे. हा भाग पाण्यावाचून कोरडा ठणठणित झाला आहे. यामुळे या परिसरात चालणारा मासेमारी तसेच बोटिंग व्यवसाय बंद झाला आहे.