pipeline bursts

पेण (Pen) तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबई, खारघर, उरण येथील रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून चिरनेर - गव्हाण फाटा रस्त्यालगत सुमारे दिड मीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे.

    उरण: नवी मुंबई (Navi Mumbai) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणातील पाईप लाईनला (Water Pipiline Bursts) चिरनेर गावाजवळील रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वेगातील डम्परने धडक दिल्याने पाईपलाईन फुटण्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी साधारण १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या घटनेची माहिती मिळताच सिडको (Cidco) पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    पेण (Pen) तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबई, खारघर, उरण येथील रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून चिरनेर – गव्हाण फाटा रस्त्यालगत सुमारे दिड मीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. या पाईपलाईनमधून अनेकदा जास्त दाबाने पाणी पुरवठा होत असतो. मंगळवारी सकाळी साधारण १०.१५ च्या सुमारास चिरनेर गावाजवळील रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डम्परची धडक पाईपलाईनला बसली असता पाईपलाईनमधून पाण्याचे फवारे उडायला सुरुवात झाली. खूप उंचावर हे फवारे उडत होते.

    मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात हा चिरनेर गावाजवळील माकड डोरा आदिवासी वाडीजवळ झाला आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरीकांनी या घटनेची माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पाईप लाईन मधून सुरु असणारा पाणी पुरवठा बंद केला आहे, अशी माहिती सिडको पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

    अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जातं. परिणामी ज्या भागात त्या पाईपलाईनने पाणी पुरवठा होतो तिथे पाण्याची कमतरता निर्माण होते. याआधीही अशा पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.