ढाणेवाडीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

ढाणेवाडी (ता. कडेगाव) गावात गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करूनही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ सध्या मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.  

  कडेगाव : ढाणेवाडी (ता. कडेगाव) गावात गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करूनही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ सध्या मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.

  पाण्यासाठी शेकडो मैल भटकंती

  कडेगाव तालुक्याच्या पूर्वेस सातारा व सांगली जिल्ह्याच्या टोकावर ढाणेवाडी हे गाव वसलेले आहे. हे गाव ताकारी व टेंभू या दोन्ही योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. गावाच्या काही अंतरापासून टेंभू योजनेचे पाणी जाते. परंतु हे गाव पाण्यापासून वंचित असून, गावात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव पाठवून देखील पाणी देण्यास दिरंगाई होत आहे.

  पाण्यासाठी महिलांना शेकडो मैल

  भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी जि. प. अध्यक्ष असताना नेवरी प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून गावाची पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नव्हती. परंतु सध्या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे.

  नागरिकांमध्ये संतापाची लाट

  सध्या उन्हाळा संपत आला तरी पाण्याची सोय होत नसल्याने नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट निर्माण झाली आहे. या गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते याची अधिकाऱ्यांना माहिती असूनही अधिकारी तिकडे फिरकलेच नसल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. या गावांसाठी कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्याची गरज आहे.