
एकीकडे अतिवृष्टी होऊन नद्यांना महापूर आले असताना दुसऱ्या बाजूला जत तालुक्यातील १६ गावांना १८ टँकरद्वारे ४३ हजार ६१३ लोकांना पाणीपुरवठा सुरु आहे. १८ तलाव कोरडे पडलेले आहेत. कायम दुष्काळी तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यातही दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.
जत : एकीकडे अतिवृष्टी होऊन नद्यांना महापूर आले असताना दुसऱ्या बाजूला जत तालुक्यातील १६ गावांना १८ टँकरद्वारे ४३ हजार ६१३ लोकांना पाणीपुरवठा सुरु आहे. १८ तलाव कोरडे पडलेले आहेत. कायम दुष्काळी तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यातही दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.
कायमस्वरूपी अवर्षणप्रवण म्हणून जत तालुका ओळखला जातो. तालुक्यात अवकाळी व मान्सून पूर्व पावसाने दांडी मारली आहे. निम्मा पावसाळा झाला तरी सुध्दा गेल्या दोन महिन्यांत तालुक्यात केवळ १९.७ मि.मी.पाऊस झाला आहे. आठवडाभरापासून मध्यम स्वरुपाचा रिमझिम पाऊस होत आहे. विहीरी, तलाव, बंधारे यांना पाणी आलेले नाही.
पिण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. भूजल पातळी दोन ते तीन मीटरने घटली आहे. पाण्याअभावी विहीरी, तलाव, कूपनलिका, बंधारे कोरडे पडले आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी विहीर, कूपनलिका, तलाव अधिग्रहण केले आहेत. निगडी खुर्द, शेड्याळ, सिंदूर, पांढरेवाडी, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सोन्याळ, सालेगिरी-पाच्छापूर, कुडणूर, वायफळ, गुगवाड, जाडरबोबलाद, संख, गिरगाव, वळसंग ही १६ गावे व त्याखालील १३२ वाड्या-वस्तीवरील ४३ हजार ६१३ लोकांना पाणीपुरवठा सुरु आहे. शासकीय ५ व खाजगी १३ गावांना असे एकूण १८ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. मंजूर खेपा ४१.२५ आहेत. प्रत्यक्ष खेपा ३४ होत आहेत.
जनावराचे हाल होणार
तालुक्यात खरीपाच्या १.४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या २० वर्षातील निचांकी आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. मान्सून पावसाने दांडी दिल्याने खुरट्या गवताची उगवण झाली नाही. परिणामी पशुधन संकटात सापडले आहे. जनावर टाचा घासून मरण्याची वेळ आली आहे. ज्यांच्याकडे चारा नाही. त्यांच्या जनावराचे हाल होणार आहेत.
टँकरने पाणीपुरवठा गावे:१६
वाड्या-वस्ती :१३२
शासकीय टँकर :५, खाजगी टँकर:१३
मंजूर खेपा :४१.२५, प्रत्यक्ष खेपा :३४
बाधित लोकसंख्या :४३ हजार ६१३