शहरावर पाणी कपातीचे संकट, पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ नाही; आता…

गेल्यावर्षीच्या तुलनेत जुलै महीन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील्याने खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नाही. पावसाने दडी मारली तर पुढील काळात शहरातील पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे.

    पुणे : गेल्यावर्षीच्या तुलनेत जुलै महीन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील्याने खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नाही. पावसाने दडी मारली तर पुढील काळात शहरातील पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे. गेल्या तीन आठवड्यांत झालेल्या पावसामुळे केवळ साडेतीन टीएमसी पाणीसाठा वाढला असून पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे आज अखेर खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणात आठ टीएमसी पाणी असले, तरी पावसाची दडी कायम राहिल्यास अडचणी वाढणार आहेत.

    खडकवासला धरणासाखळीत पाणीसाठा वाढत असला, तरी तो अजूनही अपेक्षित आणि पुरेसा नाही. त्यामुळे शहराच्या पाणीकपातीत वाढ केली जाण्याची भीती आहे. दरम्यान, मनपा प्रशासन १९ जुलैपर्यंत चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे. त्यानंतर दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. शहरात १८ मे पासून आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवले जात आहे.

    दरम्यान हवामान विभागाने २३ जूनपासून पुढे आठवडाभर चांगल्या पावसाची शक्‍यता वर्तविली होती. त्यामुळे पालिकेने जूनअखेरीस पाण्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. पण, जून अखेरीस धरणांमध्ये पाणी वाढण्यास सुरूवात झाल्याने महापालिकेने आणखी “वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली.

    महापालिकेतील वरिष्ठ व अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हवामान विभागाने धरणक्षेत्रात १५ जुलैनंतर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आठवडाभर हा पाऊस राहणार असल्याचा अंदाज महापालिकेस कळविला आहे. त्यामुळे पालिकेने पाणीकपातीबाबत हवामान विभागाच्या अंदाजाला प्राधान्य देत पावसाची प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, १५ जुलैनंतर अपेक्षित पाऊस न झाल्यास व अपेक्षित असा पाणीसाठा न वाढल्यास पाणीकपातीचा आढावा घेतला जाणार आहे. हवामान विभागाने यापूर्वीच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कमी पावसाचा अंदाज दिला आहे. तो खरा ठरल्यास उपयुक्त पाणीसाठा वर्षभर पुरवावा लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.